Virat Kohli Controversial LBW OUT, IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी मालिकेचा दुसरा सामना दिल्लीत खेळला जात आहे. हे विराट कोहलीचे होम ग्राउंड आहे, म्हणून चाहत्यांना त्याच्याकडून जास्त अपेक्षा होती. पण सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावात कोहलीने ४४ धावा केल्या. मॅथ्यू कुनहेनमनने त्याला बाद केले. या विकेटवरून चांगलाच वाद पेटला आहे. कुनहेनमनचा चेंडू कोहलीच्या पॅडवर आदळला होता. ते पाहून फील्ड अंपायरने त्याला बाद ठरवले. कोहलीने निर्णयावर DRS ची मदत घेतली. त्यात चेंडू बॅट-पॅडला एकाच वेळी लागत अशल्यासारखे वाटले, त्यामुळे अखेर अंपायर्स कॉल च्या माध्यमातून त्याला बाद ठरवण्यात आले. या निर्णयाचा साऱ्यांनी निषेध केला असला तरी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने मात्र अंपायरला पाठिंबा दर्शवला आहे.
गंभीरचा पंचांना पाठिंबा!
विराट कोहलीच्या बाबतीत जे घडले त्यामुळे साहजिकच चाहत्यांनी संताप व्यक्त केला आणि सोशल मीडियावर पंचांना ट्रोल केले. या दरम्यान, बर्याच दिग्गजांनी हे प्रकरण त्यांच्या वक्तव्यासह वादात ठेवले. माजी भारतीय सलामीवीर गौतम गंभीर याने पंचांना पाठिंबा दर्शविला. 'जेव्हा आम्ही पुन्हा पुन्हा DRS रिप्ले पाहिला त्यावेळी आम्हाला अशा काही गोष्टी दिसल्या की त्यावर आम्हीही निर्णय घेऊ शकणार नाही. अशा वेळी तुम्ही मैदानातील पंचांकडून पहिल्या प्रयत्नात अचूक निर्णयाची अपेक्षा करणे चुकीचे आहे', अशी भूमिका गंभीरने मांडली. 'पंचांकडे निर्णयासाठी फारच कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, पंचांना चुकीचे म्हटले जाऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या जागी योग्य निर्णय घेतला,' असेही गौतम गंभीर म्हणाला.
गंभीर शिवाय, माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफर आणि माजी क्रिकेटपटू अभिनव मुकुंद यांनीही यावर मत मांडले. विराट कोहलीची ती विकेट म्हणजे त्याचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. कोहलीच्या बाबतीत जे झाले ते चुकीचेच झाले असेही त्यांनी मत मांडले.
ICC चा नियम काय?
कोहलीने LBW चा DRS घेतल्यावर, असे दिसते की बॅट आधी पुढे आली होती पण चेंडू पॅडला पहिले लागल्याचे पंचांना वाटले. असे असताना, कोहलीला बाद ठरवण्यात आले. जर ICC चा नियम अशा प्रकरणांमध्ये दिसला तर कोहलीसोबत येथे चूक झाली आहे. MCC च्या नियम. ३६.२.२ नुसार, जर LBW दरम्यान चेंडू बॅट आणि पॅडवर एकत्र लागला असे दिसत असेल तर तो बॅटवर लागल्याचे मानला जाईल. हे स्पष्ट आहे की हा नियम म्हणतो की अशा परिस्थितीत बॉल बॅटला लागला असे मानला पाहिजे, परंतु कोहलीच्या बाबतीत असे झाले नाही.