मुंबई - भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. त्याने तीन सामन्यात दोन अर्धशतके फटकावली आहेत. दरम्यान, विराटने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर केलेल्या एका विधानामुळे एका नव्या वादाल तोंड फुटले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विराटने ४४ चेंडूत ६० धावांची खेळी खेळली होती. या सामन्यानंतर विराटने इमोशनल होत सांगितले की, जेव्हा मी कसोटी कर्णधारपद सोडलं होतं, तेव्हा महेंद्र सिंह धोनीशिवाय कुणीही त्याला किमान एक मेसेजसुद्धा केला नव्हता.
आता विराट कोहलीच्या या विधानामुळे वाद पेटला आहे. माजी दिग्गज क्रिकेटपटूसह अधिकारीही आपली बाजू मांडताना दिसत आहेत. त्यातच बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सांगितले की, विराट कोहलीला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. आता तो कुठल्या विषयावर बोलत आहे, मला माहिती नाही.
हे अधिकारी म्हणाले की, विराटला सर्वांकडून पाठिंबा मिळाला आहे. अगदी बीसीसीआयपासून ते सहकारी खेळाडूंपर्यंत सर्वांनी त्याला सपोर्ट केला आहे. त्याला पाठिंबा मिळाला नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. जेव्हा त्याला हवा होता तेव्हा त्याला ब्रेक देण्यात आला. जेव्हा त्याने कसोटीचं कर्णधारपद सोडलं होतं, तेव्हा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे तो कुठल्या गोष्टीबाबत आणि काय बोलत आहे हे मला माहिती नाही.
या अधिकाऱ्यांनी बीसीसीआय आणि विराट कोहलीमध्ये वाद असल्याच्या चर्चांबाबतही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितले की, विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाही आहेत. त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे योगदान दिलं आहे, त्यासाठी सर्वजण त्याचा सन्मान करतात. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामधील उत्तम आणि महत्त्वाचा खेळाडू आहे. अगदी योग्य वेळी तो फॉर्ममध्ये परतला आहे. आता त्याने सातत्याने धावा जमवाव्यात त्या आमच्यासाठी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने चांगले ठरेल, असेही हे अधिकारी म्हणाले.