भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ आठवडाभर सुट्टीवर जाणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा सामना करण्यासाठी बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विश्रांतीवर असल्यानं त्याचे या मालिकेतही खेळणे जवळपास अशक्यच आहे. या मालिकेत काही महत्त्वाचे बदलही पाहायला मिळणार आहेत.
भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं विचार करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंवर पडणारा ताणही लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) करत आहे. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा सांभाळू शकतो.
बांगलादेशचा संघ जाहीर
शकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.
मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली
7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर
14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.
आगामी ट्वेंटी-20 मालिकेतून रिषभ पंतचा पत्ता कट? द्विशतकवीर यष्टिरक्षकाला मिळणार संधी
या मालिकेसाठी रिषभ पंत हा संघासाठी यष्टिरक्षक म्हणून पर्याय असू शकतो, असे तुम्हाला वाटेल. पण, पंतचाही पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिषभ पंतला मागील बराच काळ सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीनं आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंतला बाकावरच बसवून ठेवले आहे. बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील पंतचे स्थान डळमळीत झाल्याची चर्चा आहे. या मालिकेसाठी पंतला संघात संधी मिळेल, पण त्याचवेळी आणखी एका यष्टिरक्षकाच्या नावाचा विचार सुरू आहे.
संजू सॅमसन असे या यष्टिरक्षकाचे नाव चर्चेत आहे. मागील आठवड्यात केरळच्या फंलदाजानं एलिट गट 'अ' मधील सामन्यात गोवा संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम मोडला. संजूनं 125 चेंडूंत द्विशतक झळकावलं. त्यानं 129 चेंडूंत 21 चौकार व 10 षटकारांसह नाबाद 212 धावा चोपल्या आणि संघाला 3 बाद 377 धावांपर्यंत मजल मारून दिली. लिस्ट A क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा संजू हा आठवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी पाच द्विशतकं ही वन डे क्रिकेटमध्ये झळकावली आहेत, त्यातील तीन ही रोहित शर्माच्या नावावर आहेत, तर उर्वरित दोन सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहेत.
Web Title: Virat Kohli Could Be Rested For Bangladesh T20Is, Rohit Sharma To Lead Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.