भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारत टी-20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) मध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानसारख्या प्रबळ संघाला पराभूत केले. या सामन्यात विराट कोहली हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. विराटने या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मागे टाकत एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहलीच्या नावे झाला हा मोठा विक्रम - विराट कोहली, राहुल द्रविडला मागे टाकत इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिसाहात सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज झाला आहे. विराटने मेलबर्न येथील मैदानावर (MCG) पाकिस्तान विरुद्ध हा इतिहास रचला. या सामन्यात त्याने 53 चेंडूंचा सामना करत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा कुटल्या. त्याची ही खेळी भारतीय संघाच्या विजयासाठी महत्वाची ठरली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट - विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 528 सामन्यांत 53.80 च्या सरासरीने 24,212 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 71 शतके आणि 126 अर्धशते ठोकली आहेत. याच बरोबर, राहुल द्रविड आता सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सातव्या स्थानावर आला आहे. द्रविडने 509 सामन्यांत 45.41 च्या सरासरीने 24,208 धावा केल्या आहेत. या काळात द्रवीडने एकूण 48 शतके आणि 146 अर्धशतके ठोकली आहेत.
सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे हा मोठा विक्रम -इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम महान खेळाडू सचिन तेंदुलकरच्या नावाव आहे. त्याने एकूण 34,357 धावा केल्या आहेत. यानंतर श्रीलंकेचा माजी विकेटकीपर फलंदाज कुमार संगकाराचे नाव येते. त्याने एकूण 28,016 धावा केल्या आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पाँटिंग (27,483), श्रीलंकन फलंदाज महेला जयवर्धने (25,957) आणि दक्षिण आफ्रिकन ऑलराउंडर ग्रेट जॅक्स कॅलिस (25,534) यांचा या यादीत समावेश आहे.