IND vs SA 1st Test: भारतीय संघाचा पहिला डाव ३२७ धावांवर तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९७ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावाअखेरीस भारताने १३० धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच आफ्रिकन गोलंदाजांनी भेदक मारा करत संघाला सामन्यात परत आणले. अवघ्या ५५ धावांत त्यांनी भारताचे उर्वरित सात गडी बाद केले. भारतीय गोलंदाजांनीही तीच लय कायम राखत आफ्रिकन फलंदाजांना नाचवलं. आफ्रिकेची पहिल्या डावात पडझड होत असताना विराट कोहलीचा 'कूल' अंदाज पाहायला मिळाला. विराटच्या डान्सचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.
भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या फलंदाजांना हैराण केलं. मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यापुढे अर्ध्या फलंदाजांनी गुडघे टेकले. शमीला जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनी उत्तम साथ दिली. याच दरम्यान कर्णधार विराट कोहली वेगळ्याच मूडमध्ये दिसून आला. अवघ्या चार-पाच सेकंदासाठी कोहली सहजच नाचताना दिसला. स्टेडियमधील नक्की कोणत्या गाण्यावर त्याने ठेका धरला होता ते समजू शकलं नाही. पण त्याचा सहजच केलेला डान्स पाहून कॉमेंटेटरही हसू लागले.
पाहा तो व्हिडीओ-
दरम्यान, भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी झटपट गडी गमावल्यानंतर आफ्रिकन फलंदाजांनीही खराब कामगिरी केली. पहिल्या षटकात कर्णधाराची विकेट गमावलेल्या आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात आणखी चार बळी गमावले. क्विंटन डी कॉक आणि टेंबा बावुमा या दोन अनुभवी खेळाडूंनी काही काळ झुंज दिली. पण दुसऱ्या सत्रात डी कॉक ३४ धावा काढून माघारी परतला. टी टाईमनंतर पुन्हा मैदानात उतरलेल्या बावुमाने अर्धशतक पूर्ण केलं पण ५२ धावा करून तो बाद झाला. कगिसो रबाडाने उपयुक्त अशा २५ धावा केल्या. पण आफ्रिकन संघ २००च्या आतच बाद झाला.