भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अखेरीस ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडण्याचे जाहीर केले. मागील काही दिवसांपासून विराट आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडेल अशी चर्चा होती. रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती, परंतु बीसीसीआयनं हे वृत्त खोडून काढले होते. मात्र गुरुवारी विराटनं यावर मौन सोडलं. यानंतर कॉमेन्ट्रेटर आणि विश्लेषक हर्ष भोगले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
"विराटची खेळाप्रती निष्ठा अतिशय चांगली होती. टी-२० विश्वचषकापूर्वी त्याला किमान दोन महिन्यांसाठी कॅप्टनसीपासून आराम मिळेल यासाठी तो RCB चं नेतृत्व सोडेल असं वाटलं होतं," अशी प्रतिक्रिया हर्ष भोगले यांनी दिली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.
- भारतीय संघाचे फक्त प्रतिनिधित्वच नव्हे तर नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या प्रवासात मला पांठिबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. सहकारी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, माझे प्रशिक्षक आणि प्रत्येक भारतीय यांच्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता.
- कामाचा ताण हा महत्त्वाचा भाग आहे आणि मागील ८-९ वर्षांपासून तीनही फॉरमॅटमध्ये वर्कलोड वाढला आहे आणि ५-६ वर्षांपासून मी नेतृत्वाची जबाबदारीही सांभाळत आहे. त्यामुळे मला आता स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा, जेणेकरून मी वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व समर्थपणे पेलू शकेन. ट्वेंटी-२०त मी टीम इंडियासाठी सर्वोत्तम दिले आणि पुढेही फलंदाज म्हणून योगदान देत राहीन.
- रवी भाई, रोहित आणि जवळच्या प्रत्येक व्यक्तीशी मी चर्चा केली. त्यानंतरच मी हा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. याबाबत मी सचिव जय शाह व अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशीही चर्चा केली.