सेंच्युरिअन- सेंच्युरिअनमध्ये सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कॅप्टन कोहलीच्या विराट खेळीमुळे टीम इंडियाला पुन्हा ट्रॅकवर आणून ठेवलं. पहिल्या डावात आफ्रिकेच्या 335 धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 5 आऊट 182 अशी बिकट झाली होती. पण, विराट कोहलीने हार्दिक पंड्या आणि आर. अश्विन यांना साथीला घेत भारतीय संघाचा डाव सावरला. विराटने मॉर्ने मॉर्केलला चौकार ठोकत दिमाखात १५० धावा पूर्ण केल्या. त्यानंतर विराटने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला. त्याने दीडशतक पूर्ण झाल्यानंतर आपल्या वेडिंग रिंगला किस केलं. विराटच्या या कृतीने त्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावरही विराटच्या या कृतीची चर्चा रंगली आहे.
डिसेंबर महिन्यात कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. तेव्हापासून विराट आणि अनुष्का सातत्याने चर्चेत आहेत. आफ्रिकेतील पहिल्या कसोटीत विराटला योग्य खेळी करता आली नाही. तसंच, दुसऱ्या कसोटीतील संघ निवडीवरूनही त्याच्यावर टीका करण्यात आली. पण, विराटने त्याच्या उत्कृष्ट बॅटिंगने सगळ्या चर्चांना व टीकेला पूर्णविराम देत उत्तर दिलं. 150 रन्स पूर्ण झाल्यानंतर विराट मॉर्ने मॉर्कलच्या गोलंदाजीवर लगेच बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव 307 धावांवर आटोपला.
सेंच्युरियनमध्ये शतक ठोकणारा कोहली पहिला विदेशी कर्णधार सेंच्युरियनमध्ये शतक ठोकणारा कोहली पहिला विदेशी कर्णधार ठरला. यापूर्वी येथे प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने २०१० साली सर्वाधिक ९० धावांची खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा कोहली दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी १९९७ मध्ये सचिन तेंडुलकरने कर्णधार म्हणून केपटाऊनमध्ये शतक झळकावले होतं. दक्षिण आफ्रिकेत कोहलीचे हे दुसरे कसोटी शतक असून तेंडुलकरने येथे पाच कसोटी शतक ठोकले आहेत.