Join us  

कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव

डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध अडखळला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 5:27 AM

Open in App

नवी दिल्ली: माजी कर्णधार विराट कोहली हा शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीसाठी तयारीत कुठलीही कसर शिल्लक ठेवू इच्छित नाही. अरुण जेटली स्टेडियमवर बुधवारी विराट अन्य सहकाऱ्यांपेक्षा अर्धा तास आधी पोहोचला. काही मिनिटांत ड्रेसिंग रुममध्ये तयारी करत थेट नेटमध्ये सरावासाठी दाखल झाला. 

फलंदाजी सरावासाठी त्याला भरपूर वेळ हवा होता. थ्रो डाऊनचा सराव आटोपल्यानंतर विराटने मध्यम वेगवान गोलंदाजांचा मारा खेळून काढला. त्यानंतर तो जवळच्या नेटमध्ये शिरला. तेथील ओबडधोबड खेळपट्टी पाहून विराट म्हणाला, ‘फिरकी गोलंदाजांना बोलवा!’ त्याने खेळपट्टी न्याहाळली शिवाय आपल्या बूटांनी ती आणखी ‘रफ’ केली. यादरम्यान फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी कोहलीला फिरकीविरुद्ध खेळताना काही सल्ले दिले.

भारताच्या अ संघाकडून खेळणारा सौरभ कुमार या डावखुऱ्या गोलंदाजाने विराटला त्रस्त केले. टप्पा पडल्यानंतर अधिक उसळी घेत नसलेल्या चेंडूंवर विराट जास्तच गोंधळलेला जाणवला. त्याचवेळी त्याने  पुलकित नारंगप आणि ऋतिक शौकिन यांचा ऑफ स्पीन मारा खेळला. खेळताना मात्र विराटमधील आक्रमकता दृष्टीस पडली नाही.  कोटलाची खेळपट्टीही नागपूरच्या खेळपट्टीसारखीच संथ असण्याची अपेक्षा आहे. कोटलाच्या खेळपट्टीवर थोडे गवत आहे, मात्र जाणकारांच्या मते  हे गवत केवळ माती पकडून ठेवण्यासाठी आहे. थंड वातावरणामुळे दिवसा खेळपट्टीवर ओलावा असेल. त्याचा फायदा गोलंदाजांना मिळू शकतो.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघविराट कोहली
Open in App