India vs West Indies 3rd ODI : भारत-वेस्ट इंडिज वन डे मालिका निर्णायक वळणावर आहे. भारताने पहिल्या वन डेत दमदार विजय मिळवला, परंतु यजमान वेस्ट इंडिजन दुसरी वन डे जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती दिली गेली होती आणि हा निर्णय विंडीजच्या पथ्यावर पडला. वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघ प्रयोग करताना दिसतोय. पहिल्या वन डेमध्येही युवा खेळाडूंना आघाडीला फलंदाजीला पाठवले होते, परंतु त्यांचे अपयश पाहून रोहित सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. विराटला तर संधीच मिळाली नाही. अशात निर्णायक वन डे सामन्यात विराट खेळणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या वन डेत ११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५ विकेट्स गमवाव्या लागल्या होत्या. इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर हे आघाडीला फलंदाजीला आले होते. दुसऱ्या वन डेत विराट व रोहितच्या अनुपस्थितीत भारताचा संपूर्ण संघ १८१ धावांत तंबूत परतला होता. संजू सॅमसनला त्या सामन्यात संधी दिली, परंतु तो अपयशी ठरला.
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादवला संधी देत आहेत. पण, ट्वेंटी-२०चा फॉर्म त्याला वन डेत दाखवता आलेला नाही. अशात तिसरी वन डे संजू व सूर्यासाठी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जागा पक्की करण्यासाठीची शेवटची संधी असेल. सूर्याला १२ सामन्यांत १३.६०च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत, तर सॅमसनची सरासरी ही ७३.६६ अशी राहिली आहे.
दरम्यान, तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ पोर्ट ऑफ स्पेनला दाखल झाला आहे, परंतु विराटने संघासोबत प्रवास केलेला नाही. त्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित मात्र उद्या खेळणार आहे. पण, त्यासाठी संघातून अक्षर पटेल याला बाहेर बसावे लागू शकते.