मुंबई : एकीकडे आयपीएलचा धमाका सुरू असताना, दुसरीकडे बीसीसीआयने गुरुवारी आपल्या खेळाडूंचे केंद्रीय करार जाहीर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारी वार्षिक रक्कम पाहून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींचे डोळे विस्फारले. दखल घेण्याजोगी बाब म्हणजे, एकट्या विराट कोहलीचे वेतन हे संपूर्ण पाकिस्तान संघाच्या वार्षिक वेतनाइतके असल्याचे यावेळी दिसून आले.
बीसीसीआयने जाहीर केलेल्या केंद्रीय करारामध्ये विराट, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना ‘ए प्लस’ गटामध्ये ठेवले आहे. या करारानुसार या तिन्ही स्टार खेळाडूंना प्रत्येकी ७ कोटी रुपये वार्षिक वेतन मिळणार आहे. बीसीसीआयच्या वेतन करारामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी असे चार गट असतात. यामध्ये अनुक्रमे ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि एक कोटी असे वार्षिक वेतन दिले जाते.जाहिरातींच्या मार्केटमध्येही कोहलीचा चांगलाच बोलबाला आहे. मात्र, त्याच्या एकूण कमाईतून जाहिरातीतून मिळणारा पैसा जरी वेगळा केला, तरी जवळपास संपूर्ण पाकिस्तान संघाच्या वार्षिक कमाई इतकी असल्याचे दिसून येते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या करारामध्ये तीन गटवारी आहेत. यातील सर्वोच्च ए गटातील अव्वल तीन खेळाडूंना ११ लाख पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ५.२० लाख रुपये प्रत्येक महिन्याला मिळतात. या गटात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी व अजहर अली यांचा समावेश आहे.
बी गटाला ७.५० लाख पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात ३.५४ लाख रुपये) आणि सी गटाला ५.५० लाख पाकिस्तानी रुपये (भारतीय चलनात २.६० लाख रुपये) दर महिन्याला मिळतात. पाकिस्तानने ए गटात ३, बी गटात ९ व सी गटात ६ खेळाडूंना ठेवले आहे.
वार्षिक खर्च ७.४ कोटी रुपये!भारतीय चलनानुसार पाकिस्तानी रुपयाचे मूल्यांकन केल्यास संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघाचे वार्षिक वेतन हे जवळपास एकट्या विराट कोहलीच्या वार्षिक वेतनाइतके असल्याचे दिसून येईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दरवर्षी आपल्या खेळाडूंच्या वेतनावर ७.४ कोटी रुपये खर्च करते.