मुंबई, दि. 2 - श्रीलंकेविरोधात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 4-0 ची आघाडी घेत मालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. चौथ्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे भारताने धावांचा डोंगर उभा केला होता. दोघांनी 219 धावांछी भागीदारी श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने हातात माईक घेत विराट कोहलीची मुलाखत घेऊन टाकली. यावेळी गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघ कशाप्रकारे बलाढ्य संघ म्हणून उदयास आला यावर चर्चा करण्यात आली. या मुलाखतीत सर्वात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे विराट कोहलीने सपोर्ट स्टाफचे आभार प्रदर्शन करताना कुठेही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचा साधा उल्लेखही केला नाही.
रोहित शर्माने विराट कोहलीचं अभिनंदन करत मुलाखतीला सुरुवात केली. मुलाखतीदरम्यान विराट कोहलीने सांगितलं की, 'हा भारतीय संघ परफॉर्म करण्यासाठी भुकेला आहे ज्यामुळे माझं काम हलकं होतं. मी फक्त क्षेत्ररक्षणाच्या जबाबदारीसाठी मैदानात असतो, उर्वरित काम खेळाडू करुन टाकतात'. 'कोलंबोमध्ये प्रचंड गर्मी असल्याने आम्ही सोळाव्या ओव्हरनंतर एकहून जास्त धाव पळून न काढण्याचं ठरवलं होतं', असा खुलासाही विराटने यावेळी केला. 'फलंदाजी करण्यात एवढे गुंग होते की फलंदाज स्कोअरबोर्डकडे पाहतही नव्हते', असंही विराट बोलला आहे.
रोहित शर्माने यावेळी सपोर्ट स्टाफच्या भूमिकेबद्दल विचारलं असता विराटने सांगितलं की, 'सपोर्ट स्टाफचं योगदान खूप मोठं आहे. 2014 मध्ये माझ्यावर कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र सपोर्ट स्टाफच्या मदतीने सातव्या क्रमांकावरुन आपण पहिल्या क्रमांकावर पोहोचलो. ते सर्वजण टीमसाठी स्पेशल असून सर्वांसोबत त्यांचं चांगलं जुळतं. आमची फलंदाजी सुधारली याचं सर्व श्रेय रघुला जातं. त्याने आणि संजय बांगरने खूप मेहनत घेतली'.
मुलाखत पाहण्यासाठी -
'श्रीधरने क्षेत्ररक्षणात, अरुण पाजी यांनी गोलंदाजीत मेहनत घेतली आणि रवी भाई यांनी दिलेला आत्मविश्वास आमच्या कामी आला. रवी शास्त्रींची आत्मविश्वास वाढवण्याची पद्दतच वेगळी आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मजा येते. एका मोठ्या कुटुंबासोबत असल्यासारखं वाटतं', असं सांगत विराटने आभारप्रदर्शन संपवलं.
यावेळी विराट कोहलीने एकदाही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचा उल्लेख केला नाही. विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदातील जास्त काळ कुंबळेंच्या मार्गदर्शनाखाली घालवला आहे. अनिल कुंबळे प्रशिक्षक होते तेव्हाच भारताने 2016-17 मध्ये घरच्या मैदानावर कसोटीमध्ये मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे विराट कोहलीने आपल्यातील वाद विसरुन अनिल कुंबळेंचेही आभार मानायला तशी काहीच हरकत नव्हती.