बंगळुरु : जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला होता. त्याने भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकली आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने आता आफ्रिदीची चांगली कानउघडणी केली आहे.
बंगळुरु येथे कोहली आयपीएलचा सराव करत आहे. बुधवारी त्याला काही पत्रकारांनी आफ्रिदीने केलेल्या ट्विटबद्दल विचारले. त्यावर देशाविरोधात गरळ ओकणाऱ्याला कधीच माफ करणार नाही, असे कोहलीने म्हटले आहे.
" एक भारतीय म्हणून तुम्ही नेहमीच देशाच्या हिताचा विचार करता. पण जर कोणी माझ्या देशाविरोधात कुणी काही बोलणार असेल तर ते कधीच खपवून घेतले जाणार नाही, " असे कोहलीने म्हटले आहे.
कोहली आणि आफ्रिदी हे मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. पण जर कुणी आपल्या देशाच्या विरोधात बोलत असेल तर त्याला थारा देणार नाही, हे कोहलीने आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे.