Join us  

IND vs SA 1st Test: किंग कोहलीचा 'विराट' विक्रम! केला धोनी, गांगुलीलाही न जमलेला भीमपराक्रम

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने आफ्रिकेविरूद्धची पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-०ची आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:50 PM

Open in App

India vs South Africa 1st Test: भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी धूळ चारली. भारताने दिलेलं ३०५ धावांचं आव्हान पार करताना आफ्रिकेचा संघ १९१ धावांतच बाद झाला. मोहम्मद शमीने संपूर्ण सामन्यात सर्वाधिक आठ बळी घेत आपली गोलंदाजीतील चमक दाखवून दिली. मात्र पहिल्या डावात दमदार शतक ठोकणाऱ्या केएल राहुलला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्याने १२३ धावांची अप्रतिम खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने काही खास विक्रमांना गवसणी घातली.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाताळच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरपासून कसोटी सामना सुरू झाला. २६ डिसेंबरला सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) म्हंटलं जातं. भारताने आफ्रिकेविरूद्धची बॉक्सिंग डे कसोटी जिंकली. भारताचा हा तिसरा बॉक्सिंग डे कसोटी विजय ठरला. २०२० साली मेलबर्नच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं होतं. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकला. महत्त्वाची बाब म्हणजे दोन विजय दक्षिण आफ्रिकेविरूद्ध (२०१८ आणि २०२१) त्यांच्याच भूमीवर मिळाले. त्यामुळे आफ्रिकेत दोन बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकणारा विराट पहिला कर्णधार ठरला.

विराटने आजच्या विजयासह आणखी मोठा पराक्रम केला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा तिन्ही देशांमध्ये दोन-दोन कसोटी विजय प्राप्त केले. अशी कामगिरी करणारा देखील विराट हा एकमेव भारतीय कर्णधार ठरला. सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी दोघांच्या कारकिर्दीत अनेकदा भारतीय संघ या देशांच्या दौऱ्यावर आला मात्र, त्यांना हा पराक्रम करता आला नाही. विराटने मात्र हा भीमपराक्रम करून दाखवला.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीअजिंक्य रहाणेमहेंद्रसिंग धोनी
Open in App