Is Virat Kohli following MS Dhoni's footsteps? : भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या निर्णयानं साऱ्यांनाच धक्का बसला. एखादी कसोटी मालिका गमावली म्हणून खचणाऱ्यातला विराट कोहली नक्कीच नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पराभव या निर्णयामागे असल्याचे कारण असू शकत नाही. विराटनं कसोटी क्रिकेट संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला अन् इथे महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) पाच वर्षांपूर्वी केलेलं विधान व्हायरल होऊ लागलं. त्यावरून विराट कोहली कॅप्टन कूलच्या पावलावर पाऊल ठेवतोय, असा अंदाज बांधला जात आहे.
भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराटचे नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं गेलं आहे. त्यानं कसोटी संघाचे कर्णधारपद हाती घेतलं, तेव्हा भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावर होता आणि आज जेव्हा त्यानं ही जबाबदारी सोडली तेव्हा भारत अव्वल स्थानावर आहे. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून त्याचा फलंदाजीतील विक्रम पाहता. त्यानं ११३ डावांमध्ये ५४.८०च्या सरासरीनं ५८६४ धावा केल्या आहेत आणि त्यात २० शतकं व १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळलेल्या ११ पैकी ११ कसोटी मालिका भारतानं जिंकल्या आहेत. त्याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज येथे कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून विराट अव्वल स्थानी आहे. त्यानं ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले आहेत.
काय म्हणाला होता महेंद्रसिंग धोनी?
एकाच खेळाडूनं तिनही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व करावं, यावर माझा विश्वास आहे. विराटनं जेव्हा कसोटी कर्णधारपद स्वीकारलं तेव्हा हेच माझ्या डोक्यात सुरू होतं. स्पिट कॅप्टन्सी ( तीन संघांसाठी तीन वेगळे कर्णधार) यावर माझा विश्वास नाही. स्पिट कॅप्टन्सी भारतात चालणारी नाही. विराट कोहली या जबाबदारीसाठी तयार कधी होतोय, याची मी वाट पाहत होतो. माझ्या हा निर्णय चुकीचा नाही. हा संघ तिनही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करू शकतो आणि मी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे, असे धोनी २०१७मध्ये म्हणाला होता.
ट्वेंटी-२० व वन डे संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे आणि त्यामुळे कसोटीचेही नेतृत्व त्याच्याकडेच असावे अशी कदाचित विराटची इच्छा असावी. विराटनेही धोनीचे आभार मानले. त्यानं लिहिलं, ''महेंद्रसिंग धोनीचे मनापासून आभार, त्यानं कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा विश्वास त्यानं दाखवला.''