दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फलंदाज लोकेश राहुल हे आयसीसीच्या नव्या टी-२० क्रमवारीत फलंदाजीत क्रमश: चौथ्या आणि सहाव्या स्थानी कायम आहेत. गोलंदाजांच्या यादीत मात्र पहिल्या दहामध्ये एकही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.
इंग्लंडचा डेव्हिड मलान फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर कायम असून आघाडीच्या सात फलंदाजांच्या क्रमवारीत कुठलाही बदल झालेला नाही. द. आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आठव्या तर विंडीजचा एविन लुईस नवव्या स्थानी आहे.
गोलंदाजांमध्ये तबरेज शम्सी अव्वल स्थानावर असून त्यानंतर वानिंदु हसरंगा आणि राशिद खान यांचा क्रम लागतो. अनुभवी भुवनेश्वर कुमार १२ तसेच जखमी झालेला ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर १८ व्या स्थानी आहे. युजवेंद्र चहलने २५ वे स्थान पटकविले. अष्टपैलूंच्या यादीत हार्दिक पांड्या अव्वल २० खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शाकिब अल हसन याच्याऐवजी अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानी विराजमान झाला.