Virat Kohli vs Gautam Gambhir Fight: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात तुफान राडा झाला होता. दोघांमध्ये भरमैदानातच जोरदार भांडण झाले. सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेला वाद साऱ्यांनी पाहिला. त्यानंतर बीसीसीआयने RCB चा स्टार खेळाडू कोहली आणि LSG चा मेंटर गौतम गंभीर यांना दंड ठोठावला. दोघांना मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. त्या दोघांनी नक्की किती पैसे गमावले हे तर साऱ्यांना अंदाज आलाच पण हा दंड नक्की कोण भरणार.. खेळाडू की संघ? असे काही प्रश्न लोकांच्या मनात घोळत आहेत. त्याचेच उत्तर आता तुम्हाला मिळणार आहे.
विराट कोहलीचा आयपीएलमधील पगार 15 कोटी रुपये आहे. म्हणजेच एका वर्षात त्याला RCB कडून 15 कोटी रुपये मिळतात. अशा परिस्थितीत त्याची एका सामन्याची फी 1.07 कोटी रुपये झाली. म्हणजेच लखनौ विरुद्धच्या सामन्यातील लढतीनंतर त्याला 1.07 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 1.07 कोटी रुपये मॅच फी एका हंगामातील 14 सामन्यांवर आधारित आहे.
कोहलीच्या खिशाला धोका नाही!
बंगलोरचा संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरल्यास आणि त्याचा प्रवास पुढे सुरू राहिल्यास सामन्यांच्या संख्येच्या आधारे सामन्याची फी ठरवली जाईल. एकूणच कोहलीला एक कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. तथापि, असे असूनही, त्याच्या खिशावर याचा भार येणार नाही, कारण हा दंड तो भरणार नाही, तर त्याची फ्रँचायझी भरणार आहे. क्रिकबझच्या मते, फ्रँचायझी कोहलीच्या पगारातून कपात करणार नाही. या तोट्याचा भार स्वतः फ्रँचायझी उचलणार आहे.
गंभीरला 25 लाखांचा दंड
दुसरीकडे, गंभीरची एका सामन्याची फी 25 लाख रुपये आहे आणि त्याचा दंडही फ्रँचायझी भरणार आहे. बहुतेक फ्रँचायझी स्वतः त्यांच्या खेळाडूंचा दंड भरतात. स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावल्यानंतरही फ्रँचायझी खेळाडूच्या पगारातून कपात करत नाहीत.
बीसीसीआयकडून पाठवलं जातं बिल
प्रत्येक हंगाम संपल्यानंतर, बीसीसीआय संघाला लावलेल्या सर्व दंडाचे एकत्रित बिल पाठवते आणि नंतर फ्रँचायझी ते भरते. फ्रँचायझी खेळाडूंच्या पगारातून कपात करते की नाही हा संघाचा अंतर्गत विषय आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये, फ्रँचायझी खेळाडूंना दंड आकारत नाही.