IPL 2023, Virat Kohli vs Gautam Gambhir fight: फलंदाज अपयशी ठरल्यानंतर गोलंदाजांनी टिच्चून मारा करत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (आरसीबी) मर्यादित धावसंख्येचे यशस्वी संरक्षण करुन दिले आणि लखनौ सुपरजायंट्सचे कडवे आव्हान १८ धावांनी परतावले. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ९ बाद १२६ धावा केल्यानंतर आरसीबीने लखनौला १९.५ षटकांत १०८ धावांमध्ये गुंडाळले. मात्र आरसीबी आणि लखनौचा सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादामुळे गाजला.
लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लखनौ विरोधात विराट कोहली फिल्डिंग करताना उत्साहित दिसला. प्रत्येक सामन्यानंतर जणू बेंगलोरमधील पराभवाचा वचपा काढत होता. विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.
सदर प्रकरणानंतर आयपीएल व्यवस्थापनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयपीएलनं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल- हक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीरवर मॅच फीसच्या १०० टक्के रकमेचा दंड त्याच्यावर लावण्यात आला. तर नवीन उल हक याला सुद्धा मॅच फीमधील ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
कोणाला किती दंड बसला पाहा-
विराट कोहली- १ कोटी ०७ लाख (१००%)
गौतम गंभीर- २५ लाख (१००%)
नवीन उल हक- १ लाख ७९ हजार (५०%)
तिघांची मिळून एकुण दंड रक्कम- १ कोटी ३३ लाख ७९ हजार
नवीन उल हक कोण आहे?
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने लखनौ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा तो अफगाणिस्तानचा सहावा खेळाडू आहे. नवीन उल हकची टी-२० कारकीर्द खूप प्रभावी राहिली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३४ विकेट घेतल्या आहेत. लखनौ संघाला नवीन-उल-हककडून मोठ्या आशा होत्या. त्या आशेप्रमाणेच नवीन उल हकने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ३ विकेट्स पटकावल्या.
Web Title: Virat Kohli, Gautam Gambhir fined 100 percent fees after verbal spat, Naveen-ul-Haq cops 50 percent fine
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.