Join us  

शहिदांसाठी दोन मिनिटं शांत राहू शकत नाही का?; कॅप्टन कोहली चाहत्यांवर चिडला

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 12:40 PM

Open in App

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. 127 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघालाही संघर्ष करण्यास यजमानांनी भाग पाडले. मात्र, अखेरच्या चेंडूवर कांगारूंना विजय मिळवण्यात यश आले आणि त्यांनी 3 विकेट राखून हा सामना जिंकला. भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीनं नाराजी प्रकट केलीच, परंतु चाहत्यांच्या वर्तणुकीवरही तो चिडला. पहिल्या सामन्यापूर्वी भारत- ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. पण, चाहत्यांना दोन मिनिटेही शांत बसवत नव्हते आणि त्यांचे ओरडणं सुरूच होतं. त्यांच्या या कृत्याचा कोहलीला राग आला आणि त्यानं ओठांवर बोट ठेवून प्रेक्षकांना शांत राहण्याच्या सूचना केल्या.14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. केंद्र सरकारनेही या हल्ल्याचा वचपा काढला जाईल असा निर्धार केला आहे आणि भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी होत आहे. विशाखापट्टणम येथील सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी दोन मिनिटे स्तब्ध उभं राहुल पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांचा कल्ला सुरूच होता आणि कर्णधार कोहलीला त्यांना शांत बसण्यासाठी खुणवावे लागले.

रोहित शर्मा ( 5) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघात झोकात पुनरागमन केले. कोहलीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. राहुलने 36 चेंडूंत 50 धावा केल्या. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या काही चमक न दाखवता माघारी परतले. धोनी एका बाजूने टिकून खेळत होता, परंतु त्यालाही मोठे फटके मारता येत नव्हते. भारताला 20 षटकांत 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. मात्र, ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.  

पूर्ण व्हिडिओ...http://www.bcci.tv/videos/id/7353/team-india-and-australia-pay-homage-to-martyrs

टॅग्स :विराट कोहलीपुलवामा दहशतवादी हल्लाभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया