Virat Kohli clarification: BCCIच्या वार्षिक करारातून विराट कोहलीला वर्षाला ७ कोटींचे मानधन मिळते. विराटचे हे मानधन जगातील इतर स्टार खेळाडू ख्रिस्टिआनो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांच्या तुलनेत बरेच कमी आहे. पण विराट कोहली हा इन्स्टाग्राम ( Instagram Earnings) या सोशल साईटवर अँक्टीव्ह असतो. विराट त्याच्या एका इन्स्टा पोस्टवरून बरीच कमाई करतो. इतकेच नव्हे तर त्याचे एका पोस्टमधून मिळणारे मानधन रोनाल्डो, मेस्सीला टक्कर देणारे आहे अशीही चर्चा होती. मात्र याच दरम्यान विराटने एक ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
काय आहे विराटचे ट्विट?
विराटच्या म्हणण्यानुसार, त्याच्या सोशल मीडियातून होणाऱ्या कमाईबाबतच्या आलेल्या बातम्या या असत्य आहेत. मला आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही मिळालंय, त्यासाठी मी देवाचा आणि तुम्हा सर्वांचा आभारी व ऋणी आहे. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी करत असलेल्या कमाईच्या बाबतीत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या खऱ्या नाहीत, असे विराटने स्पष्टीकरण दिले आहे.
इंस्टाग्राम शेड्युलिंग टूल हॉपर एचक्यू द्वारे संकलित केलेल्या यादीनुसार, महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) या यादीत सर्वांवर भारी पडला आहे. सलग तिसऱ्या वर्षी त्याने अव्वल स्थान कायम राखले आहे. जागतिक सुपरस्टार आणि फुटबॉल आयकॉन रोनाल्डोने सलग तिसऱ्या वर्षी इन्स्टाग्रामचा सर्वाधिक कमाई करणारा सेलिब्रेटी म्हणून नाव पटकावले आहे. पोर्तुगालचा सुपरस्टार रोनाल्डो प्रति पोस्ट $३.२३४ दशलक्ष (अंदाजे रु. २६.७६ कोटी) इतकी रक्कम कमावतो. लिओनेल मेस्सी इंस्टाग्रामवरून प्रति पोस्ट $२.५९७ दशलक्ष (अंदाजे २१.४९ कोटी) कमाईसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारताचा सुपरस्टार विराट कोहली यादीत १४व्या स्थानावर आहे. तो प्रति पोस्ट सुमारे $१.३८४ दशलक्ष (अंदाजे ११.४५ कोटी रुपये) कमवतो. पण विराटने मात्र ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे.