नवी दिल्ली : ‘विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार आहे. मात्र, सहकाऱ्यांसोबतची त्याची वागणूक लहानपणीच्या मित्रासारखी असते. भारताच्या कर्णधारापुढे मी उभा आहे, असे कधीही वाटत नाही.’ अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने विराटबाबत हे वक्तव्य केले आहे.एका वेबसाइटशी बोलताना शमी म्हणाला, ‘विराट नेहमी गोलंदाजांना पाठिंबा आणि मनाप्रमाणे गोलंदाजीचे स्वातंत्र्य देतो. कोहली आम्हाला आमच्या योजनांबाबत विचारतो. आम्ही आमच्या योजनांमध्ये अपयशी ठरलो तरच तो सल्ला देतो. वेगवान गोलंदाजीबाबत विचाराल तर विराटने कधीही आमच्यावर दडपण आणले नाही. तुम्ही कर्णधार कोहलीपुढे उभे आहात, असे कधीही वाटणार नाही. तो बालपणीच्या मित्रासारखा तुम्हाला वागणूक देतो.’‘अनेकदा विराट फारच गंमतीदार वाटतो. तो जोक करतो, अनेकांची फिरकी घेतो, तर अनेकदा तो रागातही येतो. याविषयी मात्र आम्हा सहकाऱ्यांना कधीही वाईट वाटत नाही. आम्ही सर्वजण देशासाठी खेळत आहोत. कुठलाही कर्णधार तुम्हाला अशाप्रकारचे स्वातंत्र्य देत असेल, असे मला तरी वाटत नाही,’ असे मत शमीने व्यक्त केले.
- भारताच्या वेगवान माऱ्यासंदर्भात शमी म्हणाला, ‘आमच्या संघाचा मारा संतुलित आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू समन्वय निर्माण करतात. भारतीय गोलंदाजांना कामगिरी करताना पाहून प्रतिस्पर्धी संघ त्रस्त होतात. त्यामुळे खेळपट्टी तयार करण्यावरून त्यांच्यात संभ्रम निर्माण होतो. वेगवान खेळपट्टीवर भारताचे वेगवान गोलंदाज सक्षम आहेतच, शिवाय फिरकीला पूरक खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटू काय कमाल करू शकतात, हे सर्वश्रुत आहे. - कर्णधाराकडे जाताना एखाद्या खेळाडूमध्ये नेहमी भीती असते. मात्र, विराटबाबत असे काहीही नाही. तो आमच्यासोबत भावाप्रमाणे आणि मित्राप्रमाणे वागतो. ड्रेसिंग रूममधील वातावरण विराटमुळे हसते-खेळते असते, हे मी आवर्जून सांगू इच्छितो.’ पाच कसोटी सामन्यांच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी शमी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे नुकतेच भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.