नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वामध्ये सर्वोत्तम कर्णधार कोण... हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. पण आपल्या कल्पक नेतृत्वाने आयपीएल गाजवणाऱ्या शन वॉर्नने मात्र सध्याच्या घडीला कुणीही चांगला कर्णधार नाही असे म्हटले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा एक कर्णधार म्हणून बरेच विक्रम रचत असला तरी तोदेखील सर्वोत्तम कर्णधार नाही, असे स्पष्ट मत वॉर्नने व्यक्त केले आहे.
सध्याच्या कर्णधारांबद्दल वॉर्न म्हणाला की, " कोहली हा एक चांगला लीडर आहे. तो प्रमाणिक आहे. पण तो सर्वोत्तम कर्णधार नाही. कारण टीम पेन किंवा केन विल्यमसन यांना कोहलीपेक्षाही चांगली रणनीती आखता येते. रणनीतीच्या बाबतीत कोहली हा पिछाडीवर आहे," असे वॉर्नने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
वॉर्नपुढे म्हणाला की, " मी कोहलीचा चाहता आहे. त्याच्या नेतृत्वामध्ये चांगली संघबांधणी झाली आहे. कोहली एक चांगला क्रिकेटपटू आहे. एक लीडर म्हणूनही त्याने चांगले नाव कमावले आहे. पण फक्त चांगला लीडर असणे म्हणजे सर्वोत्तम कर्णधार, असे होत नाही. कोहलीने रणनीतीवरही यापुढे भर द्यायला हवा."
भारतासाठी धोनी महत्वाचाभारताला जर विश्वचषक जिंकायला असेल तर संघात महेंद्रसिंग धोनीसारखा अनुभवी खेळाडू असायला हवा. कारण धोनी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तो एक सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर धोनीचा अनुभव हा संघासाठी फार महत्वाचा ठरू शकतो. या विश्वचषकासाठी भारताबरोबर इंग्लंडही प्रबळ दावेदार असल्याचे मला वाटते, असेही वॉर्न म्हणाला.