ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फ्लॉप शोनंतर किंग कोहली देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवणार का? हा मुद्दा सध्या चर्चेत आहे. रणजी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत २३ जानेवारीला दिल्ली विरुद्ध सौराष्ट्र यांच्यातील लढत रंगणार आहे. या सामन्या साठी दिल्लीच्या संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत किंग कोहलीच्या नावाचाही समावेश आहे. पण आता तो या सामन्यापासून दूर राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोहली देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासंदर्भातील सस्पेन्स वाढला आहे. कारण त्याची मान दुखावल्याची बातमी समोर येत आहे.
कोहलीची मान लचकली?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीची मान लचकली आहे. यावरील उपचारासाठी कोहलीनं इंजेक्शन घेतल्याचाही उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला आहे. TOI नं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, या किरकोळ दुखापतीमुळे तो उर्वरित दोन रणजी सामन्यापैकी पहिल्या सामन्याला मुकू शकतो. दिल्ली अँण्ड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (DDCA) कोहलीसंदर्भातील ही माहिती मिळाली नाही. त्यांना ही अपडेट मिळाल्यावर तो खेळणार की, नाही हे चित्र स्पष्ट होईल.
पंत मैदानात उतरणार, पण विराट दूरच राहणार?
रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सौराष्ट्र विरुद्धच्या सामन्यासाठी २० जानेवारीला दिल्लीचा संघ राजकोटला रवाना होणार आहे. लढतीआधी दिल्लीच्या संघाचे दोन दिवसीय ट्रेनिंग सेशन आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रिषभ पंत मैदानात उतरणार अन् तोच या संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित झाले आहे. आता विराट कोहलीसंदर्भातील अंतिम निर्णय हा DDCA च्या बैठकीत स्पष्ट होईल. ही बैठक शुक्रवारी १७ जानेवारीला संध्याकाळी पार पडणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्टार खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती; पण विराटला सूट मिळणार?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर भारतीय स्टार खेळाडूंसंदर्भात बीसीसीआयने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. त्यात देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचीही सक्ती करण्यात आली आहे. ही वेळ जवळ आली असताना विराटची मान लचकल्याचे वृत्त समोर येत आहे. दुखापतीसारख्या परिस्थितीत खेळाडूंना या नियमातून सूट मिळू शकते. कोहलीच्या बाबतीत तेच घडू शकते.