Sanjay Manjrekar selected Team India Squad for T20 World Cup 2024: भारतात सध्या IPLची धामधूम सुरु आहे. सर्वच संघ दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परदेशी खेळाडू आपला 'स्पार्क' दाखवत आहेतच. पण भारतीय खेळाडूही तुफान फॉर्मात आहेत. फक्त अनुभवी खेळाडूच नव्हे तर युवा खेळाडूही आपली चमक दाखवत आहेत. IPL ही T20 World Cup साठी रंगीत तालीम आहे. त्यामुळे IPLच्या कामगिरीच्या आधारावर आगामी टी२० विश्वचषकासाठी संघ निवड केली जाणार आहे. १ जूनपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अनेक दिग्गज आणि माजी क्रिकेटपटू आपापल्या पसंतीचे संघ निवडत आहेत. त्यातच मुंबईकर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने १५ खेळाडूंचा संघ निवडला असून त्यात विराट कोहलीसह दोन बड्या खेळाडूंना संघातून वगळले आहे.
विराट कोहली, हार्दिक पांड्या संघात नाही!
संजय मांजरेकर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना सलामीला तर सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून निवडले आहे. यात आश्चर्याची बाब म्हणजे, IPLमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक धावा करून अव्वल असणाऱ्या विराट कोहलीला संघातून वगळण्यात आले आहे. मांजरेकरांनी यष्टीरक्षक फलंदाजांवर अधिकचा विश्वास दाखवत संजू सॅमसन, रिषभ पंत आणि केएल राहुल या तिघांनाही संघात जागा दिली आहे. अष्टपैलू खेळाडूंसाठी मात्र त्यांनी केवळ रवींद्र जाडेजालाच संघात स्थान दिले आहे. हार्दिक पांड्या किंवा शिवम दुबेला संघात समाविष्ट करण्यात आलेले नाही.
दोन नवख्या गोलंदाजांवर विश्वास
गोलंदाजांची निवड करत असताना संजय मांजरेकरांनी दोन नवख्या खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. KKRचा हर्षित राणा आणि लखनौचा मयंक यादव या दोघांना त्यांनी स्थान दिले आहे. मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि आवेश खान या अनुभवी त्रिकुटालाही संधी दिली आहे. तसेच कुलदीप आणि चहल या जोडीसह कृणाल पांड्याला संघात स्थान दिले आहे.
संजय मांजरेकरांनी निवडलेला संघ (Sanjay Manjrekar's India squad for T20 World Cup):-
- फलंदाज-रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव
- यष्टीरक्षक- संजू सॅमसन, रिषभ पंत, केएल राहुल
- अष्टपैलू- रवींद्र जाडेजा
- गोलंदाज- युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, हर्षित राणा, मयंक यादव, कृणाल पांड्या