Join us  

विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरून टीका करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाला, बॉक्समध्ये बसून...  

कोहलीची खेळी आणि विल जॅक्सच्या ४१ चेंडूत नाबाद १००* धावांमुळे RCBला चार षटके आणि नऊ गडी राखून २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 3:32 PM

Open in App

IPL 2024 :  विराट कोहलीने ( Virat Kohli) काल अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ४४ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या आणि त्यानंतर IPL मध्ये फिरकी गोलंदाजीच्या विरोधात त्याच्या स्ट्राइक रेटवर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.  कोहलीची खेळी आणि विल जॅक्सच्या ४१ चेंडूत नाबाद १००* धावांमुळे RCBला चार षटके आणि नऊ गडी राखून २०१ धावांपर्यंत मजल मारता आली.  कोहली सामन्यानंतर म्हणाला,"स्ट्राइक रेटबद्दल बोलणारे आणि मी स्पिन चांगले खेळत नाही, अशा वायफळ चर्चा करणे लोकांना आवडते. पण माझ्यासाठी संघासाठी जिंकणे महत्त्वाचे आहे आणि मागील १५ वर्ष असेच करण्यामागचं हे कारण आहे. तुम्ही हे दिवसेंदिवस करत आहात; तुम्ही तुमच्या संघांसाठी सामने जिंकले आहेत." 

GT विरुद्धच्या खेळीनंतर कोहलीने सातव्यांदा IPLच्या एका मोसमात ५०० धावा करण्याचा पराक्रम केला. आयपीएल २०२४ मध्ये तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध १६१.६२ आणि फिरकीपटूंविरुद्ध १२३.५७ च्या स्ट्राइक रेटसह खेळला होता, परंतु GT च्या फिरकी आक्रमणाचा त्याने चांगला सामना केला. कोहलीने राशिद खान, नूर अहमद आणि साई किशोर यांच्याविरुद्ध १७९ च्या स्ट्राइक रेटने ६१ धावा केल्या. २०१६ पासून ट्वेंटी-२०च्या एखा डावात फिरकीविरुद्धचा त्याचा सर्वोच्च (किमान १० चेंडू) स्ट्राईक रेट आहे.  कोहली म्हणाला, "तुम्ही स्वत: अशा परिस्थितीत गेला असाल असे मला वाटत नाही, तुम्ही फक्त बॉक्समध्ये बसून खेळाबद्दल बोलता. माझे काम करत राहणे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. लोक त्यांच्या स्वतःच्या कल्पना आणि खेळाबद्दलच्या गृहीतकांबद्दल बोलू शकतात, परंतु ज्यांनी वर्षानुवर्षे हे काम केलेले आहे, त्यांना हे माहित आहे." नऊ विकेट्सने विजय मिळवूनही RCB तीन विजय आणि सात पराभवांसह गुणतालिकेत तळाशी आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२४विराट कोहली