India tour of South Africa : वन डे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर भारतीय संघातील सीनियर खेळाडू विश्रांतीवर गेले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली युवा टीम मैदानावर उतरली आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे आणि तेथील ट्वेंटी-२० व वन डे मालिकेत न खेळण्याचा निर्णय विराट कोहलीने ( Virat Kohli) बीसीसीआयला कळवला आहे. विराटला आणखी काही दिवस विश्रांती हवी आहे. कर्णधार रोहित शर्माचं अद्याप काही ठरलेलं नाही.
वन डे वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ आता २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. हार्दिक पांड्याकडे या संघाचे नेतृत्व असेल असा अंदाज आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांचे वय लक्षात घेता ते हा वर्ल्ड कप खेळतील यावर अनेकांना शंका आहे. पण, रोहितने याही वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करावे आणि विराटनेही खेळावे, अशी अनेक क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी भारतीय संघाकडे फक्त ११ ट्वेंटी-२० सामने आहेत आणि त्यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे. त्यामुळे रोहित व विराट यांचे ट्वेंटी-२० खेळणे महत्त्वाचे असल्याचेही जाणकारांचे मत आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ३५ वर्षीय विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरीत ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० मालिकेतून बीसीसीआयकडे विश्रांती मागितली आहे. १० डिसेंबरपासून हा दौरा सुरू होणार आहे आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विराट संघात परतणार आहे. २० डिसेंबरला भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे.
''मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून आणखी काहीकाळ ब्रेक हवा असल्याचे विराटने बीसीसीआय व निवड समितीला कळवले आहे. त्याला जेव्हा मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळावेसे वाटेल, तेव्हा त्यांनी सांगावे, असेही बीसीसीआयने त्याला कळवले आहे. सध्याच्या घडीला तो कसोटी क्रिकेट खेळणार आहे,''असे सूत्रांनी सांगितले. रोहित शर्मालाही मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबतच निर्णय त्याच्यावर सोपवला आहे. पण, दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत त्याने अद्यात त्याचा निर्णय सांगितलेला नाही.
विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यापासून सातत्याने खेळतोय. त्याने या कालावधीत १५ वन डे व ३ कसोटी सामने खेळले आहेत. वन डे वर्ल्ड कपमध्ये विराटने ११ सामन्यांत सर्वाधिक ७६५ धावा केल्या आणि सचिन तेंडुलकरचा वन डेतील सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रमही मोडला.