नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. रोमहर्षक सामन्यात भारताने ४ गडी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. विराट कोहलीने एकतर्फी झुंज देऊन निसटता विजय मिळवला. किंग कोहलीने या सामन्यात ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी केली होती. खरं तर आशिया चषकापासून विराट त्याच्या जुन्या लयनुसार खेळत आहे. मागील मोठ्या कालावधीपासून खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या कोहलीवर विविध स्तरातून टीका झाली होती. मात्र त्याने पाकिस्तानविरूद्धच्या खेळीतून सर्वानांच गप्प केले असल्याचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हटले आहे.
विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी पाहताना मी भावुक झालो असल्याचे शास्त्रींनी म्हटले. "विराटची सर्वात मोठी टी-२० खेळी पाहताना मी भावुक झालो होतो. मला आश्चर्य वाटले नाही कारण मी हे घडण्याची वाट पाहत होतो. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर हे घडणार हे मला माहिती होते. इथे त्याचा विक्रम पाहा, येथील खेळपट्ट्या त्याला अनुकूल आहेत आणि त्याला या मैदानांवर आणि इथल्या चाहत्यांसमोर खेळणे आवडते. त्याचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड नेहमीच चांगला राहिला आहे आणि ही एक मोठी परिस्थिती होती", असे शास्त्री यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना सांगितले.
विराटची खेळी पाहताना भावुक झालो - शास्त्री
तसेच हे सगळे होत असताना मी भावुक झालो. मागील काही वर्षात तो काही अनुभवत आला आहे हे मी पाहिले आहे. अलीकडे जे काही घडले ते सर्वांना माहिती आहे. मला काय कोहलीला सांगायचे होते ते त्याला चांगले माहिती होते. कोहली काय करू शकतो ते त्याला आणि मलाही माहिती होते. मात्र त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली असल्याचे शास्त्रींनी म्हटले. शास्त्री यांनी पुढे कोहलीच्या टीकाकारांवर निशाणा साधताना म्हटले, "माध्यमांनी देखील विराटवर सडकून टीका केली होती. क्रिकेट जगतासाठी तो पूर्वीही सुपरस्टार होता आणि असेलही. आता तो त्यांच्यासाठी (टीकाकारांसाठी) काय आहे हे त्यांनाच ठरवू द्या. मी त्यांच्यासाठी शब्दात मांडणार नाही. विराट कोहलीचे पुढे काय आहे? मला काही अपेक्षा नाहीत, फक्त त्याला राहू द्या. त्याला फक्त त्याच्या आयुष्याचा आनंद घेऊद्या."
सगळ्यांना गप्प केले ना?
माध्यमांनी देखील न तुटलेल्या हिऱ्यावर पुरेसा दबाव टाकला आणि तो कोण आहे हे दाखवून दिले. मात्र आता विराट कोहलीने शानदार खेळीने सर्वांनाच गप्प केले ना? अशा शब्दांत शास्त्री यांनी विराट कोहलीचे कौतुक केले आणि त्याच्या टीकाकारांवर निशाणा साधला. विराटने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला.
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळी
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Virat Kohli has silenced everyone, right Former India coach Ravi Shastri takes aim at Kohli's critics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.