न्यूझीलंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीचा फटका टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला बसला आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील अव्वल स्थानावरून कोहलीला पायउतार व्हावं लागलं आहे. कोहलीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. दुसरीकडे संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराही गोलंदाजांच्या क्रमावारीत टॉप टेनमधून बाहेर फेकला गेला आहे.
विराटला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत अनुक्रमे 2 व 19 अशा केवळ 21 धावा करता आल्या. तो आता 906 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच्या खात्यात 911 गुण झाले आहेत. कोहलीसह. अजिंक्य रहाणे ( 760), चेतेश्वर पुजारा ( 757) आणि मयांक अग्रवाल ( 727) यांनी अनुक्रमे 8, 9 आणि 10वे स्थान पटकावले आहे.
जसप्रीत बुमराहला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत केवळ एकच विकेट घेता आली. त्याची ( 756) 11 व्या स्थानावर घसरण झाली आहे. आता टॉप टेनमध्ये आर अश्विन हा एकमेव भारतीय आहे. अश्विन 765 गुणांसह 9व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्स आणि नील वॅगनर हे अव्वल दोन क्रमांकावर आहेत. अश्विनचीही एका स्थान घसरण झाली आहे.