नवी दिल्ली : सध्या खराब फॉर्मशी झगडत असलेला विराट कोहली इंग्लंड दौऱ्यानंतर सुटीवर आहे. आशिया चषक स्पर्धेपर्यंत तो विश्रांती घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता बीसीसीआयने कोहलीची विश्रांती कमी करण्याचे ठरविल्याची माहिती मिळाली आहे. आशिया चषक स्पर्धेआधी होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याबाबत बीसीसीआयने कोहलीला कळवले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीत भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याआधी २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धेत कोहली झिम्बाब्वेविरुद्ध खेळला होता, तसेच २०१३ नंतर कोहलीने झिम्बाब्वेविरुद्ध कोणतीही मालिका खेळलेली नाही. त्यामुळे हरवलेला फॉर्म पुन्हा मिळवण्यास कोहलीला या मालिकेचा फायदा होईल. ९ वर्षांनी कोहली पुन्हा झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत खेळताना दिसेल. भारतीय संघ यंदा आशिया चषक आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत संभाव्य विजेता म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळेच कोहलीने झिम्बाब्वेविरुद्ध खेळून दमदार पुनरागमनाचा प्रयत्न करावा, यासाठी बीसीसीआयने त्याला खेळविण्याचे ठरविल्याचे सूत्रांनी सांगितले.
विराटने बायको, मुलीसह गाठले पॅरिस!
वेस्ट इंडिज दौऱ्यातून विराट कोहलीला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती मिळाली आहे. तो पुढील महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाऊ शकतो. कोहलीला सध्या एका महिन्याचा ब्रेक मिळाला आहे. पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत तो फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पोहोचला. कोहली कुटुंब सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी पॅरिसला गेले आहे. अभिनेत्री आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही माहिती मिळाली. अनुष्काने एक फोटो शेअर केला. तिने हॅलो पॅरिस लिहिताना सांगितले आहे की, ती सध्या पॅरिसमध्ये आहे. मात्र, आता कोहलीला आपली सुट्टी लवकर संपवून राष्ट्रीय संघात परतावे लागेल.