कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं क्रिकेट वर्तुळालाही अनेक धक्के दिले. भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिनं कोरोनामुळे आई व बहिणीला गमावले, प्रिया पुनिया हिच्या आईचेही मंगऴवारी कोरोनामुळेच निधन झाले. भारताची माजी महिला क्रिकेटपटू केएस श्रवंती नायडू ( Sravanthi Naidu) हिची आई एस के सुमन यांचा कोरोनाशी लढा सुरू आहे. त्यांच्या उपचारासाठी श्रवंतीनं आधीच १६ लाख रुपये खर्च केले आहेत आणि तिला आणखी मदतीची गरज आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं श्रवंतीच्या आईच्या उपचारासाठी 6.77 लाखांची मदत केली आहे.
श्रवंतीनं बीसीसीआय हैदराबाद क्रिकेट असोसिएशन आणि अन्य संघटनांकडे मदत मागितली होती. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर, भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांनीही श्रवंती हिला मदत करण्याचे आवाहन केलं होतं. बीसीसीआयच्या दक्षिण विभागातील महिला क्रिकेटचे संयोजक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन शिवलाल यादव यांची बहीण एन विद्या यादव यांनी विराट कोहलीला ट्विट टॅग करून श्रवंतीला मदत करण्याचे आवाहन केलं होतं. कोहलीनं विद्या यांच्या ट्विटला लगेच उत्तर दिले आणि मदतही केली.
''विराट कोहलीचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी आश्चर्यचकीत झाले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी हा मुद्दा कोहलीला सांगितला, त्यांचेही आभार,''असे विद्या यांनी सांगितले. हैदराबाद क्रिकेट असोसिएशननं पाच लाखांची मदत केली आहे.
विराट कोहली व अनुष्का शर्मा यांचा पुढाकारविराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेतून रिकॉर्डतोड निधी गोळा केला आहे. सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे. त्यांनी स्वतः २ कोटी दान केले. काल MPL Sports Foundationनं ५ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर ७ कोटींचं लक्ष्य पार झाले आणि विराटनं पुन्हा ११ कोटींचं लक्ष्य समोर ठेवले आणि आज तेही पार केले. विराट व अनुष्कानं या मोहिमेतून ११ कोटी ३९ लाख ११, ८२० जमा केले आहेत.