भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ( Virat Kohli) आशिया चषक २०२२ स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी करून १०२१ दिवसांचा दुष्काळ संपवला. नोव्हेंबर २०१९नंतर विराटला आंतरराष्ट्रीय शतक झळकावण्यात अपयश आले होते. त्याच्या खेळावर टीका झाली, त्याने कर्णधारपद सोडले, एक-दीड महिना विश्रांती घेतली अन् अखेर ७१वे आंतरराष्ट्रीय शतक आले. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील हे त्याचे पहिलेच शतक ठरले आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर विराटचा फॉर्म परतल्याने चाहतेही खूश झाले आहेत. त्यात विराटने एक आणखी एक विक्रम नावावर केला आहे. जगात असा पराक्रम करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
विराट कोहलीचेट्विटरवर ५० मिलियन म्हणजेच ५ कोटींच्यावर फॉलोअर्स झाले आहेत. ट्विटरवर इतके फॉलोअर्स असलेला विराट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. इंस्टाग्रामवरही त्याचे २११ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर फेसबूकवर ही संख्या ४९ मिलियन इतकी आहे. सोशल मीडियावर विराटचे एकूण ३१० मिलियन फॉलोअर्स आहेत. आशिया चषक २०२२ स्पर्धेत विराटने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत दुसरे स्थान पटकावले. पण, भारताला सुपर ४ मध्येच गाशा गुंडाळावा लागला. श्रीलंकेने अंतिम सामन्यात पाकिस्तानला लोळवून जेतेपद पटकावले.
hopperhq ने २०२२ मधील इंस्टाग्रामची रिच लिस्ट जारी केली आहे. या ताज्या यादीमध्ये किंग कोहलीने मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी कोहली एक इंस्टाग्राम पोस्टसाठी ५ कोटी रूपये घेत होता आणि तो १८ व्या स्थानावर होता. मात्र २०२२ च्या ताज्या यादीमध्ये त्याने ४ पाऊलांनी मोठी झेप घेत १४ व्या स्थानावर मजल मारली आहे. क्रिकेट विश्वाबद्दल भाष्य करायचे झाले तर, या यादीत कोहलीचा नंबर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी नंतर येतो. लक्षणीय बाब म्हणजे रोनाल्डो एका पोस्टसाठी १९.७१ कोटी रूपये आकारतो, तर मेस्सी एका पोस्टसाठी १४.२१ कोटी घेतो. hopperhq द्वारे जारी करण्यात आलेल्या यादीमध्ये भारतीयांमध्येविराट कोहलीनंतर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नंबर लागतो. प्रियंका एका पोस्टसाठी ३.३८ कोटी रूपये घेते आणि ती या यादीमध्ये २७ व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, आशियात सर्वाधिक ट्विटरवर फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रेटिंमध्ये विराट कोहलीच्या पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ट्विटवर त्यांचे ८२.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.