सध्या वनडे क्रिकेटमध्ये तुफान फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने आज आणखी एक विराट शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या नाबाद १६६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांमध्ये ५ बाद ३९० धावा कुटल्या. यादरम्यान, विराट कोहलीने अनेक विक्रमांची बरसात केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच फलंदाजांमध्ये विराट कोहलीने स्थान मिळवले आहे. त्याने महेला जयवर्धनेला मागे टाकले.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. या सामन्यापूर्वी त्याने २६७ सामन्यामध्ये १२ हजार ५८८ धावा केल्या होत्या. तर आज ६२ धावा काढताच तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला.
दरम्यान, या मालिकेतील दुसरे शतक फटकावत विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांची संख्या ४६ वर पोहोचवली आहे. आता विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांच्या विक्रमापासून केवळ ३ शतकांनी दूर आहे. विराटची आजची शतकी खेळी हे श्रीलंकेविरुद्धचे दहावे शतक ठरले आहे. त्याबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतके फटकावण्याचा विक्रम विराटने आज आपल्या नावे केला आहे.
तसेच आज श्रीलंकेविरुद्ध ११० चेंडूत केलेल्या नाबाद १६६ धावांच्या खेळीदरम्यान विराट कोहलीने ८ षटकार ठोकले. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील कुठल्याही डावात ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत. यापूर्वी २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिविरुद्ध जयपूर येथे झालेल्या सामन्यात शतकी खेळी करताना विराट कोहलीने ७ षटकार ठोकले होते.
तसेच घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही विराट कोहलीने आपल्या नावे केला. आज विराटने ठोकलेलं शतक हे भारतातील त्याचं २१ वं शतक ठरलं. त्याबरोबरच विराट कोहलीने २० शतके ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.