Virat Kohli, India Tour of West Indies : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेनंतर सातत्याने विश्रांती घेताना दिसतोय.. आतापर्यंत त्याने न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि आगामी वेस्ट इंडिज विरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतून विश्रांती घेतली आहे. तो वेस्ट इंडिज व इंग्लंड यांच्याविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळला आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता विराटसारख्या सीनियर खेळाडूने अशी वारंवार विश्रांती घेणे चाहत्यांना पटलेलं नाही. त्यात विश्रांती घेऊन विराटचा फॉर्म परतणार नाही, असेही अनेक जाणकारांचे मत आहे. अशात विराट किमान वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळेल अशी अपेक्षा होती आणि BCCI ही त्याची निवड करण्यासाठी तयार होते, परंतु विराटने स्वतः पुन्हा एकदा विश्रांती मागितली.
Times Now ने दिलेल्या रिपोर्टनुसार वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी विराट व जसप्रीत बुमराह यांनी विश्रांतीची मागणी केली होती. वर्कलोड मॅनेज करण्यासाठी बुमराहने ही विश्रांती मागितली होती, परंतु कोहलीला ब्रेक देण्याची निवड समितीची कोणतीच योजना नव्हती. पण, ३३ वर्षीय विराटने BCCI कडे या मालिकेत न खेळवण्याची विनंती केली. BCCI च्या योजनेनुसार वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्यांना भारताचा तगडा संघ पाठवायचा होता आणि त्यात विराटही होता. पण, त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला.
''इंग्लंड दौऱ्यापासून निवड समिती व संघ व्यवस्थापनाला ट्वेंटी-२० मालिकेत सर्व प्रमुख खेळाडूंसहच भारताचा संघ उतरवायचा होता. परंतु कोहलीने विश्रांती मागितली आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास त्याने नकार दिला. जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेज करण्यासाठी विश्रांती दिली गेली. रोहित शर्मा, रिषब पंत व हार्दिक पांड्या यांना वन डे मालिकेसाठी विश्रांती दिली गेलीय,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
मागील काही महिन्यांत विराट सातत्याने विश्रांती घेताना दिसतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतही त्याची निवड झालेली नव्हती. आता तो थेट आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात ३ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी येणार असल्याची चर्चा आहे. त्यातही विराट खेळू शकतो. विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे, परंतु त्यात सीनियर खेळाडू खेळतील अशी शक्यता फार कमी आहे.