Virat Kohli RCB Fans, IPL 2024: IPL मध्ये विजेतेपद पटकावून ट्रॉफी जिंकण्याची RCB ची संघाची प्रतिक्षा आणखी एका वर्षाने पुढे गेली. सुरुवातीला RCB चा 8 पैकी 7 सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतर सलग 6 सामने जिंकत त्यांनी प्ले ऑफ्स फेरीत स्थान मिळवले. प्ले ऑफ्स मध्ये बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात बंगळुरूला प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 172 धावा केल्या. राजस्थानने मात्र हा सामना 19व्या षटकातच 4 गडी राखून जिंकला. हा पराभव विराट कोहलीला नक्कीच जिव्हारी लागणारा ठरला. सामना हरल्यानंतर लगेच विराटने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण दोन दिवसांनी म्हणजेच आज त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांचे आभार मानले.
विराट कोहलीने यंदाच्या हंगामात RCBला प्ले ऑफ्स मध्ये पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. साखळी फेरी आणि एलिमिनेटर अशा एकूण 15 सामन्यांमध्ये मिळून विराटने 62च्या सरासरीने 741 धावा केल्या. विराटने 155च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांची धुलाई केली. त्याने संपूर्ण हंगामात 5 अर्धशतके आणि एक शतक ठोकले. सर्वाधिक धावांच्या यादीत विराट अद्यापही अव्वल आहे. पण RCB ला प्ले-ऑफ मध्येच स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्यानंतर आज विराटने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. त्याने RCB संघाचा एकत्रित असा फोटो पोस्ट केला. 'नेहमीप्रमाणे आमच्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व RCB चाहत्यांचे मनापासून आभार मानतो,' असे कॅप्शन त्याने दिले.
दरम्यान, IPLच्या यंदाच्या हंगामात पहिल्या 8 पैकी 7 सामने हरल्यानंतर सलग 6 विजय मिळवून RCB ने प्ले-ऑफ्स मध्ये प्रवेश मिळवला होता. याऊलट राजस्थानचा संघ गेल्या 4 सामन्यात पराभूत झाला होता. त्यामुळे RCB अधिक बलवान संघ मानला जात होता. पण त्यांना विजय मिळवता आला नाही. RCB ने प्रथम फलंदाजी करताना 172 धावा केल्या. हे आव्हान राजस्थानने सहज पार केले आणि RCBचा संघ स्पर्धेबाहेर झाला. त्यामुळे IPL ची ट्रॉफी उंचावण्याचे विराटचे स्वप्न भंगले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विराटला हा पराभव पचवावा लागला.