Virat Kohli, IPL 2022 RCB vs KKR : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ( Royal Challengers Banglore) बुधवारी पहिल्या विजयाची चव चाखली. RCB ने डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) ३ विकेट्स व ४ चेंडू राखून विजय मिळवला. पहिल्या सामन्यात २०५ धावा करूनही पराभूत झालेल्या RCBला या लढतीत १२९ धावांचे लक्ष्य गाठताना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. दिनेश कार्तिकने ( Dinesh Karthik) पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावताना आंद्रे रसेलने टाकलेल्या २०व्या षटकात सलग दोन चौकार मारून बंगळुरूचा विजय पक्का केला. पण, या सामन्यात चर्चा रंगली ती एका पोस्टरची...
कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. वनिंदू हसरंगाने २० धावांत ४ विकेट्स घेतल्या. आकाश दीपने कोलकाताला सुरुवातीला धक्के दिले. त्यानंतर हर्षल पटेल, मोहम्मद सिराज यांनी उत्तम कामगिरी केली. डेव्हिड विलीनेही टिच्चून मारा केला आणि कोलकाताचा संघ १८.५ षटकांत १२८ धावांत तंबूत परतला. कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक २५ धावा केल्या, तर उमेश यादव व वरुण चक्रवर्थी यांची १०व्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी ही सर्वोत्तम ठरली.
माफक धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचे आघाडीचे तीनही फलंदाज १७ धावांवर माघारी परतले. डेव्हिड विली ( १८) , शेर्फाने रुथरफोर्ड ( २८), शाहबाद अहमद ( २७) यांनी बंगळुरूसाठी संघर्ष केला. उमेश यादव ( २) व टीम साऊदी ( ३) यांनी दिलेल्या धक्क्यातून RCB कसेबसे सावरले. सुनील नरीन याने उत्तम गोलंदाजी केली आणि बंगळुरूला अखेरच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. दिनेश कार्तिकने नाबाद १४ व हर्षल पटेलने नाबाद १० धावा करून बंगळुरूचा विजय साकारला.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स स्टेडियमवर आले होते आणि त्यांच्या हातात एक पोस्टर दिसलं. त्यावर त्यांनी आम्ही चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स आहोत, परंतु इथे आम्ही फॅफसाठी आलेलो आहोत. असे लिहिले होते.