नवी दिल्ली : स्टार सलामीवीर शिखर धवन २०२१ पासून संघात दिसत नाही. त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. ‘आपण बीसीसीआयच्या कुठल्याही योजनेचा भाग नाही,’ असे खुद्द शिखरने स्पष्ट केले आहे. दरम्यान, त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वगुणांचाही उल्लेख केला. गब्बरच्या मते, दोन्ही श्रेष्ठ कर्णधार असून, स्वत:च्या शैलीमुळे त्यांनी भारतीय क्रिकेटला नावलौकिक मिळवून दिला. धवनच्या या वक्तव्याचे रोहित शर्माला वाईट वाटू शकते.
शिखर म्हणाला, ‘विराट यशस्वी कर्णधारांपैकी एक. त्याच्या नेतृत्वात खेळाडूंना बरेच काही शिकता आले. त्याने स्वत:च्या कार्यकाळात मैदान ते ड्रेसिंग रूमपर्यंत उत्कृष्ट माहोल तयार केला. आक्रमकवृत्ती जोपासण्याचा आणि फिट राहण्याचा युवा खेळाडूंना तो सल्ला देतो. युवा आणि ऊर्जावान संघ बांधणीसाठी विराट पुढाकार घेत सहकारी खेळाडूंच्या फिटनेस आणि कंडिशनिंगवर फार जोर देतो. शारीरिक फिटनेसवर भर ही विराटच्या नेतृत्वाखालील संघाची संस्कृती बनली. कोहली स्वत: पुढे येत नेतृत्व करतो. त्याची आक्रमक फलंदाजी नेहमी संघासाठी विजयी माहोल तयार करते. आपल्या सहकाऱ्यांकडून तो अशा कामगिरीची अपेक्षा बाळगतो.’
धोनीच्या नेतृत्वगुणांबाबत शिखर पुढे म्हणाला, ‘मी स्वत: २०१०ला धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केले. धोनीने नेतृत्व सोडले तेव्हा विराट उत्ताधिकारी बनला. दोघेही भारताचे यशस्वी कर्णधार आहेत. दोघांची नेतृत्वशैली मात्र वेगळी राहिली. धोनी हा सामन्याच्या स्थितीची तमा न बाळगता मैदानावर शांत आणि संयमी असतो. हीच त्याच्या नेतृत्वाची ओळख बनली. सहज निर्णय घेणे हा त्याचा स्थायीभाव आहे. दोघांच्याही नेतृत्वात मी खेळलो. दोघांसोबतही माझे संबंध चांगले आहेत. आमच्यापैकी अनके जण या दोघांसारखे बनू इच्छितात. भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देण्यास दोघे तत्पर असायचे.’