नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघ विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरूद्ध ३-३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. २० सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेला मोहाली येथून सुरूवात होत आहे. भारताला आशिया चषकात आलेले अपयश पाहता भारतीय संघाच्या मधल्या फळीत बदल होणार का याची उत्सुकता असतानाच कर्णधार रोहित शर्माने मोठे विधान केले आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेतून अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच टी-२० विश्वचषकात तिसरा सलामीवीर म्हणून विराट कोहली हा पर्याय आहे असे रोहित शर्माने सांगितले.
रोहितने मोहालीत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, "कधीकधी के.एल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष दिले जात नाही. त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहली हा विश्वचषकासाठी आमचा तिसरा सलामीवीर म्हणून पर्याय आहे. संघाकडे पर्याय उपलब्ध असणे नेहमीच चांगले असते. तसेच आम्ही तिसरा सलामीवीर न घेतल्याने विराट उघडपणे ओपन करू शकतो." एकूणच रोहित शर्माने के.एल राहुलची पाठराखण करत किंग कोहली सलामीला खेळू शकतो असे संकेत दिले आहेत.
"माझी राहुल द्रविड यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही ठरवले की मला काही सामन्यांमध्ये विराटसोबत सलामी करावी लागेल. आम्ही मागील काही सामन्यांमध्ये ते पाहिले आहे आणि आनंदी आहोत. विराटने आशिया चषकात अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी केली होती."
के.एल राहुलची केली पाठराखण
दरम्यान, कर्णधार रोहितने संघाचा प्लॅन सांगताना म्हटले, "मला वाटत नाही की आम्ही नवीन प्रयोग करणार आहोत. के.एल राहुल आमचा सलामीवीर फलंदाज असणार आहे. त्याने केलेल्या कामगिरीकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले आहे. एक किंवा दोन वाईट खेळी भूतकाळातील विक्रमांवर पडदा टाकू शकत नाहीत. आम्हाला माहिती आहे के. एल राहुलमध्ये काय प्रतिभा आहे आणि काय नाही त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे", अशा शब्दांत रोहित शर्माने के.एल राहुल सलामीचा फलंदाज असल्याचे स्पष्ट केले आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक - २० सप्टेंबर- मोहाली, २३ सप्टेंबर - नागपूर आणि २५ सप्टेंबर- हैदराबाद
Web Title: Virat Kohli is an option as a third opener at the T20 World Cup Rohit sharma's big statement ahead of ind vs aus series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.