भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, ती गोष्ट अखेर घडलीच. विराट कोहलीने तीन वर्षांनंतर आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शतक झळकावले. तब्बल १ हजार २१ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अफगाणिस्ताविरुद्ध विराटची बॅट तळपली आणि तुफान फटकेबाजी करत टी२० क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक त्याने ठोकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे ७१ वे शतक ठरले. विराटच्या या शतकानंतर जगभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यामुळे, भारतीय क्रिकेटर्संकडूनही विराटचं अभिनंदन करण्यात येत आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीनेही विराटवर स्तुतीसुमने उधलली आहेत.
आशियात चषक स्पर्धेतील विराटने अफगाणिस्तानविरुद्ध ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. त्यामुळे, भारताने हा सामना एकतर्फी जिंकला. विराटच्या या शतकामुळे त्याला पुन्हा सूर गवसल्याचं बोललं जात असून त्याचे चाहतेही आनंदी झाले आहेत. दिग्गज क्रिकेटर्सकडूनही विराटचं अभिनंदन करण्यात येत आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही विराट कोहलीचं अभिनंदन करत त्याच्या कार्यकर्तृत्वावर स्तुतीसुमने उधळली आहेत. विराट कोहली माझ्यापेक्षाही प्रतिभाशाली खेळाडू आहे. कर्णधारांची तुलना करणे योग्य नाही, असे गांगुलीने म्हटले.
कर्णधार म्हणून तुलना करण्याऐवजी एक खेळाडू म्हणून तुलना करणे योग्य आहे. कोहली माझ्यापेक्षाही प्रतिभावान आहेत. एक महिना ते मैदानापासून दूर राहिले होते. तरीही, गेल्या ३ वर्षांपासून पडलेला शतकाचा दुष्काळ त्यांनी आशिया चषकात भरुन काढला. आम्ही दोघांनीही मोठी क्रिकेट खेळली आहे, पण दोघांच्या क्रिकेटचा काळ वेगळा आहे. कोहलीपेक्षा मी जास्त क्रिकेट खेळलो आहे, मात्र ते मला मागे टाकण्याची संधी त्यांना आहे, असेही गांगुलीने म्हटले.