Virat Kohli Rohit Sharma Gautam Gambhir Team, India IND vs AUS 1st Test: भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळायला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी असा तब्बल प्रदीर्घ काळ हा दौरा सुरु असणार आहे. भारतीय संघाची नुकतीच न्यूझीलंड विरूद्धची मालिका संपली असून त्यात भारतावर ३-०ने पराभवाची नामुष्की ओढवली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धची मालिका भारताच्या WTC Final च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे संघातील महत्त्वाचा फलंदाज विराट कोहली याचा फॉर्म परतणे खूप आवश्यक आहे. पण त्याआधीच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर ब्रेंडन जुलियन याने विराटबद्दल एक मोठा दावा केला आहे.
"विराट कोहली न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेत ज्या पद्धतीने प्रत्येक वेळी बाद झाला ती गोष्ट अविश्वसनीय होती. विराटसारखा प्रतिभावान खेळाडू अशा पद्धतीने विकेट दान करतो हे पाहणे फारच वेदनादायी होते. कोहली सध्या चांगल्या फॉर्मात नाहीये हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण मला असे वाटतं की त्याचं काही तरी बिनसलंय. कदाचित तो कर्णधार रोहित शर्माशी नीट जुळवून घेऊ शकत नाहीये तसंच प्रशिक्षक गौतम गंभीर सोबतही तो फारसा निवांत दिसत नाहीये. पण मला विश्वास आहे की काहीही असले तरी कोहली लवकरच फॉर्मात परतेल. पण जर पर्थच्या पहिल्या कसोटीतही कोहलीला सूर गवसला नाही तर मात्र कठीण आहे," अशा शब्दांत माजी क्रिकेटर जुलियनने प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, विराट कोहली संघातील खेळाडूंच्या आधी ऑस्ट्रेलियात पोहोचला होता. पण प्रॅक्टिस सेशनमध्ये तो दिसत नसल्याचा प्रकार समोर आला. विराट कोहलीशिवाय अन्य काही खेळाडू सराव करताना दिसले. पहिल्या दिवशी गायब असलेला विराट दुसऱ्या दिवशीच्या सरावात दिसला. ट्रिस्टन नावाचा क्रीडा पत्रकार आपल्या एक्स अकाऊंटवरुन सातत्याने भारतीय संघातील खेळाडूंच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करताना दिसतो. याच पत्रकाराने विराटची एक खास झलक शेअर केली.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीने तयारी सुरु केली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंसह तो प्रॅक्टिस सेशनसाठी नेट्समध्ये आला होता, असा उल्लेख करत संबंधित पत्रकाराने विराट कोहलीचा प्रॅक्टिस दरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. सरावात कोहली शॉर्ट ऑफ गुड लेंग्थ आणि जलदगती गोलंदाजीवर मेहनत घेताना दिसून आल्याचेही त्या पत्रकाराने म्हटले.