मतीन खान
क्रिकेटचा देव म्हणून भलेही सचिनला ओळखले जात असले तरी एकदिवसीय क्रिकेटची आकडेवारी बघता विराट कोहलीच या प्रकारातला राजा ठरतो. बांगलादेश आणि नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटने धावांची टांकसाळ उघडताना शतकी धडाका लावला. या खेळींमुळे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बरोबरी करणारा सध्यातरी कुणीच नाही. निवृत्त झालेले महान खेळाडू सोडले तर सध्याच्या घडीचा एकही खेळाडू विराटच्या आसपासही नाही. खालील आकडेवारीच्या मदतीने माझे हे म्हणणे सिद्ध करेन.
वनडेत शतकांचे शतक ठोकणार?
आकडे सांगतात की, २५९ डावांपर्यंत विराटने सचिनला बरेच मागे टाकले. विराट हा सचिनइतका क्रिकेट खेळल्यास त्याच्या केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक धावा होतील. या प्रकारात तो शतकांचे शतकही पूर्ण करू शकतो. विराट सध्या ३४ वर्षांचा आहे. पाच वर्षे आणखी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. यंदा विश्वचषक भारतात होणार आहे. अशावेळी तो फॉर्ममध्ये परतणे भारतीय चाहत्यांसाठी सुखद अनुभव ठरावा. विराटच्या वैयक्तिक योगदानापेक्षा अधिक देशाला विश्वविजेता बनविण्यात त्याचे योगदान पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. विराट हा देशासाठी सर्वस्व पणाला लावणारा खेळाडू आहे. बशीर बद्र यांच्या या ओळी विराटबाबत तंतोतंत लागू होतात. ते म्हणतात... ‘जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पर नजर है, आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा !’
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंपैकी रोहित शर्माच कोहलीच्या जवळपास आहे. धावांच्या बाबतीत जरी विराट सचिनच्या मागे असला तरी सरासरी मात्र त्याची महानता सिद्ध करते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनची सरासरी जवळपास ४५ होती तर दुसरीकडे विराटची सरासरी ५८ पेक्षा जास्त आहे.
(लेखक लोकमत पत्रसमूहाचे सहायक उपाध्यक्ष आणि स्पोर्ट्स हेड आहेत)