- रोहित नाईक
केटविश्वात सध्या चर्चा सुरू आहे ती विराट कोहलीच्या हरपलेल्या फॉर्मची. नोव्हेंबर २०१९ पासून कोहलीला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक झळकावता आलेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून कोहलीने कमालीचे सातत्य राखले. त्याच्या फलंदाजीचा आलेख झपाट्याने उंचावत गेला. त्याची तुलना थेट दुसरा सचिन तेंडुलकर अशीच होऊ लागली. मात्र, २०१९ च्या अखेरीसपासून कोहलीचा झंझावात लुप्त झाला.
कोहली म्हणजे शतक, असे समीकरणच तयार झाले आहे. त्यामुळेच त्याच्याकडून न झालेल्या शतकी खेळीमुळे त्याच्या बॅडपॅचची चर्चा रंगू लागली. सचिन आणि कोहली या दोघांच्याही बॅडपॅचचे कारण ऑफसाइड ड्राइव्ह आहे. सचिनही सातत्याने कव्हर ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आहे. त्याने २००३-२००४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कव्हर ड्राइव्ह न मारण्याचा निश्चय केला आणि फॉर्म मिळवला. त्यामुळे अनेकांनी कोहलीला सचिनचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. पण अजून यश आले नाही.