मुंबई - भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीत सनसनाटी विजय मिळवत आज मिशन ऑस्ट्रेलिया यशस्वी केले. आता भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहली आणि इशांत शर्मा या वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गाजवणारे अनेक चेहरे हे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसणार नाहीत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या मात्र सध्या दुखापतग्रस्त असलेल्या रवींद्र जडेजा, हनुमा विहारी, मोहम्मद शमी यांना संघात स्थान देण्याल आलेले नाही. तसेच दुखापतग्रस्त उमेश यादवलाही भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. त्याबरोबरच ब्रिस्बेन कसोटीतून भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या टी. नटराजन यालाही इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारताच्या कसोटी संघात स्थान मिळू शकलेले नाही. त्याशिवाय गोलंदाज नवदीप सैनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुमार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ यालाही भारतीय संघातून डच्चू देण्यात आला आहे.
मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदरस्त कामगिरी करणारा शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर यांनी संघातील स्थान कायम राखले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व नियमित कर्णधार विराट कोहलीकडे पुन्हा एकदा सोपवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ पुढील प्रमाणे आहे.भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक) रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.