मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पराभव पत्करावा लागल्यानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या केदार जाधवने कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान गाठले. त्याने 11 स्थानांच्या सुधारणेसह क्रमवारीत 24वे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना चढउतारांचा सामना करावा लागला. तरीही दोघांनी वन डे फलंदाजांमध्ये अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान टिकवले आहे, तर शिखर धवनही 12व्या स्थानी कायम आहे.
गोलंदाजांमध्ये कुलदीप यादव 6 व्या आणि युजवेंद्र चहल 8 व्या स्थानी कायम आहेत. भुवनेश्वर कुमारने उल्लेखनीय कामगिरी करताना 16व्या स्थानी झेप घेतली. अफगाणिस्तानचा रशीद खान अष्टपैलू खेळाडूंत अव्वल क्रमांकावर कायम आहे. या यादीतील अव्वल पाचात एकही भारतीय खेळाडू नाही.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दर्जेदार कामगिरी करून चौथ्या स्थानावर झेप घेतली. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 5-0 असे निर्भेळ यश मिळवले आहे. डी कॉकने या मालिकेत 70.60 च्या सरासरीने 353 धावा चोपल्या. संघांमध्ये इंग्लंड आणि भारत हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. न्यूझीलंडनं तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे आणि दक्षिण आफ्रिकेची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानी बढती झाली आहे.