भारताचा विकेट किपर बॅटर लोकेश राहुल आणि त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी मांडलेल्या स्टार क्रिकेटर्सच्या वस्तूंच्या लिलावाची सध्या चांगली चर्चा रंगत आहे. या जोडीनं गरजू अनाथ मुलांना मदतीचा हात देण्यासाठी प्रसिद्ध खेळाडूंच्या वस्तू लिलावात मांडल्या होत्या. ज्यात विराट कोहलीसह महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यासह अन्य काही स्टार खेळाडूंच्या वस्तूंचा समावेश होता. यात कोहलीच्या वस्तूंना 'विराट' किंमत मिळाल्याचे दिसून आले.
विराट कोहलीच्या जर्सीसह ग्लोव्ह्जला मिळाली मोठी किंमत
'क्रिकेट फॉर चॅरिटी' या नावाने आयोजित केलेल्या लिलावात विराट कोहलीची जर्सी आणि त्याच्या ग्लोव्ह्जसाठी मोठी बोली लागली. लोकेश राहुल आणि अथियानं या लिलावात विक्रीसाठी काढलेली विराटची जर्सी ४० लाख तर त्याचे ग्लोव्ह्ज २८ लाख रुपयांना विकले गेले. या लिलावात अन्य खेळाडूंच्याही काही वस्तूंचा समावेश होता. ज्यात रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन्सच्या बॅटचाही समावेश होता. विराटच्या जर्सीपेक्षाही स्वस्तात विकली गेली रोहित-धोनीची बॅट
रोहितची बॅट २४ लाख तर धोनीची बॅट १३ लाख रुपयांना विकली गेली. दोन्ही बॅटमधून मिळालेली किंमत ही विराट कोहलीच्या जर्सीला मिळालेल्या किंमतीपेक्षाही ३ लाखांनी कमी आहे. या गोष्टीचीही चर्चा रंगताना दिसते.या लिलावात भारताचा वर्ल्ड चॅम्पियन कोच राहुल द्रविडच्या बॅटचाही समावेश होता. त्याच्या बॅटसाठी ११ लाख रुपयांची बोली लागली.
या खेळाडूच्या जर्सीला मिळाला सर्वात कमी भाव
लोकेश राहुलची टीम इंडियाची जर्सी ११ लाख रुपये तर त्याच्या वर्ल्ड कपमधील बॅटमधून ७ लाख रुपये मिळाले. याशिवाय जसप्रीत बुमराहची वर्ल्ड कप जर्सी ८ लाख, रिषभ पंतची आयपीएलमधील बॅटसाठी ७ लाख रुपयांची बोली लागली. निकोलस पूरनची आयपीएल जर्सीला सर्वात कमी भाव मिळाला. ज्यावर ४५ हजार रुपयांची बोली लागली. चहल आणि संजू सॅमसन यांची आयपीएल जर्सी प्रत्येकी ५०-५० हजार रुपये तर जॉस बटलरच्या आयपीएल जर्सीतून ५५ रुपये मिळाले.
लिलावातून उभारली कोट्यवधींची मदत
लोकेश राहुल हा भारतीय संघाकडून खेळताना दिसतो. त्याच्याकडे भारतीय संघातील स्टार खेळाडूंनी सही करुन दिलेल्या अनेक गोष्टींचे कलेक्शन आहे. त्यातील काही वस्तू लिलावाच्या माध्यमातून त्याने विक्रीसाठी आणल्या होत्या. या लिलावाला चांगला प्रतिसादही मिळाला. स्टार खेळाडूंच्या वस्तूंच्या लिलावातून लोकेश राहुल आणि अथियानं जवळपास १ कोटी ९३ लाख रुपये जमा केले. ही रक्कम त्यांनी विप्ला फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथ मुलांच्या मदतीसाठी दिली आहे.