क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी विराट कोहली, आर.अश्विन, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, जो रुट यांच्यासह एकूण सात जणांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) नामांकन मिळालं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या कुमार संगकारा आणि एबीडी व्हिलिअर्स यांचाही यात समावेश आहे. तर महिला क्रिकेटमध्ये भारताच्या मिताली राज, न्यूझीलंडच्या सूएज बॅट्स, ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि इलाइस पेरी, इंग्लंडच्या सराह टेलर आणि वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर यांनाही दहशकातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठीचं नामांकन मिळालं आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक नामांकन मिळालेला खेळाडू ठरला आहे. कोहलीला दशकातील सर्वोत्तम कसोटीपटू, दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि दशकातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू अशा तिन्ही प्रकारात नामांकन मिळालं आहे. दशकातील सर्वोत्तम कसोटीपटूच्या शर्यतीत कोहलीसोबत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन, श्रीलंकेचा माजी डावखुरा गोलंदाज रंगना हेराथ, पाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शहा, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांचाही समावेश आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सध्याच्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसीथ मलिंग यांना दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचं नामांकन मिळालं आहे.
सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूच्या शर्यतीत विराट कोहलीसह अफगाणिस्तानचा फिरकीकटू राशीद खान, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर यांचाही समावेश आहे.