Join us

विराट कोहली खेळणार नाही रणजी सामना; 'या' दिग्गज फलंदाजानेही दिला नकार, कारण काय?

Virat Kohli Ranji Trophy : BCCI ने ताकीद दिल्यावर विराटसह अनेक बड्या खेळाडूंनी रणजी ट्रॉफीसाठी आपापल्या उपलब्धतेबाबत माहिती दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:29 IST

Open in App

Virat Kohli Ranji Trophy : भारतीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य केल्याची माहिती नुकतीच सर्वत्र पसरली. बीसीसीआयने (BCCI) याबाबतची सक्ती केल्यानंतर विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीसाठी आपापल्या संघांच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली होती. पण आता २३ जानेवारीपासून होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत विराट कोहली खेळणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्याशिवाय केएल राहुलनेही (KL Rahul) बीसीसीआयला सांगितले आहे की तो या फेरीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. दोन्ही खेळाडूंनी खेळू न शकण्यामागे विशेष कारणं दिली आहेत.

कोहली, राहुलला का खेळणार नाहीत?

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीची मान लचकली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून तो या दुखापतीचा सामना करत आहे आणि मालिका संपल्यानंतर ८ जानेवारीला त्याने यासाठी इंजेक्शनही घेतले होते. मात्र तो अद्याप त्यातून सावरू शकलेला नाही. कोहलीने बीसीसीआयच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सांगितले की, मला अजूनही मानेला वेदना होत आहेत. यामुळे तो २३ जानेवारीला सौराष्ट्रविरुद्धचा पुढील रणजी सामना खेळू शकणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो खेळणार नसला तरी तो संघासोबत दौऱ्यावर दिसू शकतो. त्याला दिल्लीच्या संघात ठेवण्यात आले असून तो सराव करतानाही दिसला.

केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या कोपराला दुखापत झाली आहे. यामुळे तो २३ जानेवारी रोजी पंजाबविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकच्या घरच्या संघाच्या वतीने भाग घेऊ शकणार नाही. बीसीसीआयने जारी केलेल्या १० नियमांमध्ये खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य द्यावे लागेल, असे म्हटले आहे. तसे न झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते.

'हे' खेळाडू रणजी सामन्यात दिसणार!

कोहली आणि राहुल पुढील फेरीत खेळणार नसले तरी २३ जानेवारीला होणाऱ्या सामन्यात शुभमन गिल पंजाबकडून, ऋषभ पंत दिल्लीसाठी आणि यशस्वी जैस्वाल मुंबईकडून खेळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. रोहित शर्माचे नावही जवळपास निश्चित आहे. पण त्याच्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.

टॅग्स :रणजी करंडकविराट कोहलीलोकेश राहुलरोहित शर्माशुभमन गिलबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ