भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे आता भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा लोकेश राहुलकडे सोपवण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत राहुल, विराट, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांवर संघाची मदार असेल. पण असं असलं तरी भारताचा रणजी किंग वासिम जाफर याच्या मते एक वेगळाच फलंदाज गेमचेंजर ठरू शकतो. केवळ एका तासात तो फलंदाज अख्खा सामना फिरवू शकतो असा दावाच जाफरने केला आहे.
"आफ्रिकेच्या मैदानांवर खेळताना सर्वात मोठं आव्हान म्हणजे मोठी धावसंख्या उभारणे. फलंदाजांनी चांगला खेळ करून मोठी धावसंख्या केलीच पाहिजे. २०१८ च्या आफ्रिका दौऱ्यात हीच भारताची समस्या होती. त्या दौऱ्यावर केवळ विराट कोहलीच धावा करत होता. असं आता चालणार नाही. इतर फलंदाजांनीही आपली जबाबदारी ओळखून चांगली फलंदाजी करायला हवी. सध्या भारताची फलंदाजी संतुलित आहे. सहाव्या क्रमांकावर येणारा ऋषभ पंत देखील चांगली फलंदाजी करतो. इतर फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर ऋषभ पंत तासाभरात अख्खा सामना फिरवू शकतो याचा मला विश्वास आहे. फक्त चांगल्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करायला हवी", असं वासिम जाफर म्हणाला.
"भारतीय संघात सध्या वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे. भारतीय गोलंदाज नक्कीच संघाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करतील. आताची भारताची वेगवान गोलंदाजी खूप अनुभवी आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. भारताकडे दमदार गोलंदाजांचा ताफा आहे. त्यामुळे भारताने ४०० धावांचा टप्पा गाठला तर भारताच्या विजयाची शक्यता नक्कीच वाढेल", असा विश्वासही जाफरने व्यक्त केला.