Virat Kohli Test Captaincy Stepped Down: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आज तडकाफडकी कर्णधारपदाचा राजीनामा देऊन सर्वांचा धक्का दिला आहे. कोहलीनं याआधीच ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रकारात संघाचं नेतृत्त्व सोडलं होतं. त्यानंतर एकदिवसीय क्रिकेट प्रकारातही कोहलीला कर्णधारपदावरुन डच्चू देण्यात आला होता. आता कोहलीनं द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिका पराभवानंतर कसोटी कर्णधारपदावरुनही पायऊतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कोहलीच्या राजीनाम्यानंतर आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी तीन प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यात रोहित शर्माचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
१. रोहित शर्मा-विराट कोहलीनंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याचंच नाव सर्वात आघाडीवर आहे. कारण रोहित शर्मा याची याआधीच एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघासाठी बीसीसीआयनं कर्णधारपदी नियुक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय संघाला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकच कर्णधार मिळण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्माला नेतृत्त्वाचा अनुभव आहे. तसंच तिन्ही प्रकारात एकच कर्णधार असावा याकडेच बीसीसीआयचा कौल राहिला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता कसोटी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो.
२. केएल राहुलरोहित शर्मानंतर केएल राहुल याचं नाव कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी घेतलं जाऊ शकतं. रोहित आणि कोहलीनंतर केएल राहुल संघात अनुभवी खेळाडू आहे. तसंच विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल याच्याकडे संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपविण्यात आली होती. केएल राहुल सध्या अवघ्या २९ वर्षांचा आहे. त्यामुळे दिर्घकाळासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलकडे पाहिलं जाऊ शकतं. बीसीसीआयनं जर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याचा विचार केला तर केएल राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं.
३. जसप्रीत बुमराहभारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तिसरा मोठा दावेदार आहे. जसप्रीत बुमराहला नुकतंच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. बुमराह भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याचा संघात समावेश असतो. तसंच बुमराहचं कमी वय लक्षात घेता एका युवा खेळाडूला संधी देण्याच्या दृष्टीकोनातून त्याचा कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकतो.