मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन आणि वर्षातील सर्वश्रेष्ठ आयसीसी क्रिकेटर विराट कोहलीने जोहान्सबर्ग कसोटीमध्ये 12 गुणांची कमाई करत वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारालाही मागे टाकलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी कोहलीचे ९०० गुण होते. तिसरा कसोटी सामना त्याने 900 गुणांनी सुरू केला. सामन्यातील पहिल्या डावात त्यानं ५४ आणि दुसऱ्या डावात ४१ धावा करून १२ गुणांची कमाई केली. आता त्याचे ९१२ गुण झाले असून, तो आयसीसीच्या सर्वकालीन कसोटी क्रमवारीत २६ व्या स्थानी आहे. तर डॉन ब्रॅडमॅन ९६१ गुणांसह अव्वल आहेत.
सध्याच्या जागतिक कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी असलेला स्टीव्ह स्मिथ ९४७ अंकांसह सर्वकालीन यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर कोहलीने 31 व्या स्थानावरून 26 व्या स्थानावर उडी मारली आहे. त्याने ब्रायन लारा (९११), केव्हिन पीटरसन (९०९), हाशिम अमला (९००), चंद्रपॉल (९०१) आणि मायकल क्लार्क (९००) यांना मागे टाकलं आहे. गुणांच्या बाबतीत विराट कोहली आता सुनील गावसकर यांच्या जवळपास पोहोचला आहे. गावसकर यांनी १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीनंतर ९१६ गुणांची कमाई केली होती.
विराट कोहलीकडे आता जून महिन्यात अफगाणिस्तानविरूद्ध एकमात्र कसोटी किंवा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरूद्ध पाच कसोटी मालिका आहेत. यामध्ये विराटला अजून अंक जमा करण्याची संधी आहे. जोहान्सबर्ग कसोटीमध्ये रँकिंग सुधारणाऱ्या इतर खेळाडूंमध्ये अमला, डीन एल्गार आणि अजिंक्य रहाणे यांचा सहभाग आहे.