Virat Kohli Shifting to London: विराट कोहली हा टीम इंडियाच्या बड्या खेळाडूंपैकी एक. प्रत्येक मोठ्या स्पर्धा आणि मालिकेसाठी त्याची निवड होणार हे ठरलेलेच असते. विराट गेली अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळतोय. पण गेल्या काही वर्षात विराट प्रत्येक बड्या स्पर्धेनंतर लंडनमध्ये सुटी घालवण्यासाठी जातो. अनेकदा त्याच्याद्दल असेही बोलले जाते की तो लंडनमध्ये कायमचा निघून जाणार आहे. याचबाबत आता महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तो आपल्या कुटुंबासह भारत सोडून लवकरच लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.
कोच राजकुमार शर्मा काय म्हणाले?
सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर मालिका खेळत आहे. तिथे पत्नी अनुष्काही त्याच्यासोबत आहे. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, विराट पत्नी अनुष्का आणि दोन्ही मुलांसह लंडनमध्ये स्थायिक होणार आहे. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली कायमचा भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक होण्याचा विचार करत आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक म्हणाले की हो, विराटच्या मनात तसा विचार आहे आणि ते लवकरच घडताना दिसेल.
कोहलीच्या निवृत्तीवर काय म्हणाले राजकुमार शर्मा?
राजकुमार शर्मा यांना विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दलही विचारण्यात आले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर विराट निवृत्तीचा निर्णय घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राजकुमार शर्मा म्हणाले की असे अजिबात होणार नाही. विराट अजूनही तंदुरुस्त आहे. तो आणखी ५ वर्षे क्रिकेट खेळू शकतो. मी विराटला १० वर्षांचा असल्यापासून ओळखतोय. त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तो २०२७चा वनडे वर्ल्डकप नक्की खेळेल.