Virat Kohli Likely to be Rested - बराच काळ फॉर्माशी झगडणाऱ्या विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. त्यामुळे आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटला विश्रांती मिळावी, यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक लवकरच पार पडणार आहे आणि त्या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) उपस्थित राहणार आहे. त्यात आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघाची निवड केली जाणार आहे, सूत्रांच्या माहितीनुसार २६ मे रोजी ही निवड केली जाईल
जवळपास तीन वर्षांत कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही. ''दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या संघात विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. तो सातत्याने क्रिकेट खेळतोय आणि दीर्घ काळापासून तो बायो-बबलमध्येही आहे. कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय हा पॉलिसीला अनुसरूनच आहे. त्याच्यासह अन्य सीनियर्सनाही विश्रांती दिली जाऊ शकते,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने PTI ला सांगितले.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
- पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
- दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
- तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
- चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
- पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू
या मालिकेनंतर भारतीय संघ जून-जुलैमध्ये लंडन दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी आयर्लंडविरुद्ध दोन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध १ कसोटी आणि सहा मर्यादित षटकांचे सामने होणार आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्येही विराटची बॅट थंडावलेली दिसतेय. त्याने १२ सामन्यांत १९.६३च्या सरासरीने केवळ २१६ धावा केल्या आहेत.
आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेऊन निवड समिती काही निर्णय घेण्याची शक्यता आहे. ''रोहित शर्मालाही विश्रांती हवी असल्यास ती दिली जाईल. लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रिषभ पंत आदी खेळाडूंनाही विश्रांती दिली जाईल,''असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.